हलगा ब्रिजवर तेलवाहू टँकर कलंडला
तब्बल पाच तास वाहतुकीत व्यत्यय : टँकरमध्ये होते 35 टन खोबरेल तेल
बेळगाव : ट्रकला ठोकरून भरधाव टँकर कलंडल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत काहीकाळ व्यत्यय झाला. मंगळवारी सकाळी 6 वाजता हलगा ब्रिजवर ही घटना घडली असून केवळ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. तब्बल पाच तासानंतर अपघातग्रस्त ट्रक व टँकर हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. हुबळीहून बेळगावकडे येणाऱ्या खोबरेल तेलवाहू टँकरने एका ट्रकला धडक दिली. टँकरच्या ठोकरीने ट्रक पुलावरील कठड्यावर आदळला. ट्रकला ठोकरल्यानंतर महामार्गाच्या मधोमध टँकर उलटला.
या टँकरमध्ये तब्बल 35 टन इतके खोबरेल तेलाची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर महामार्गावर तेलही पडले होते. या अपघातानंतर महामार्गावरील एका बाजूच्या वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला. तब्बल पाच तास महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळवून ते सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ट्रक व टँकर हटविल्यानंतरच वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. टँकरमधून तेल पडल्यामुळेही काही काळ या मार्गावरून प्रवास करणे वाहन चालकांसाठी कठीण झाले होते. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक तुकाराम निलगार, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. क्रेनने अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. एक-दोन क्रेनने टँकर हलला नाही. त्यामुळे तब्बल चार क्रेन मागविण्यात आले. दुपारी 12 पर्यंत शर्थीचे प्रयत्न करून क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला. टँकरच्या ठोकरीनंतर ट्रक महामार्गावरील कठड्याला आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण पुलाखाली दुकाने आहेत. लोक वाहनांची प्रतीक्षा करीत याच परिसरात थांबलेले असतात. कठड्यावर न आदळता जर ट्रक खाली कोसळला असता प्राणहानी घडली होती. या अपघातात ट्रक क्लिनरसह दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
वारंवार अपघात
हलगा येथील सुवर्ण विधानसौधपासून अलारवाड ब्रिजपर्यंत महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी या परिसरात प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मंगळवारी सकाळी हलगा ब्रिजवर घडलेल्या अपघातासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले.