‘तेलशुद्धीकरण महासत्ता’
भारताची महत्त्वाकांक्षा महासत्ता होण्याची आहे. भारतामध्ये ती क्षमताही आहे. योग्य आर्थिक धोरणांचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वीकार केला असता, तर ही महत्त्वाकांक्षा एव्हाना पूर्णही झाली असती. पण प्रारंभापासूनच आर्थिक धोरण चुकल्याने ही संधी हुकली. परिणामी, आजही भारत ‘विकसनशील राष्ट्र’ (व्यवहारी भाषेत आर्थिकदृष्ट्या अप्रबळ राष्ट्र) म्हणून ओळखला जातो. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तैवान आदी देशांचा नव्याने प्रारंभ खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळातच झाला होता. तथापि, ते देश योग्य आर्थिक धोरणामुळे जवळपास सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये भारताच्या बरेच पुढे निघून गेले. ही वस्तुस्थिती क्लेषदायक असली, तरी खरी आहे. असे असले, तरी एका संदर्भात मात्र भारत खरोखरच ‘महासत्ता’ आहे. याचाही उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. हे क्षेत्र आहे, कच्च्या इंधन तेलाचे शुद्धीकरण. हे करण्याची भारताची क्षमता इतकी प्रचंड आहे, की भारत आज जगातील अनेक महासत्तांना आणि प्रगत देशांनाही पेट्रोल, डिझेल आणि इतर तेल उत्पादनांचा पुरवठा करीत आहे, याची माहिती अनेकांना नसते. भारताच्या या क्षमतेचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न..
एक महत्त्वाचा प्रश्न...
ड भारतात कच्चे तेल अत्यल्प प्रमाणात सापडत आहे. भारताची तेलाची आवश्यकता प्रचंड असल्यामुळे आपल्या आवश्यकतेच्या जवळपास 90 टक्के इतक्या प्रमाणात भारताला कच्चे तेल आयात करावे लागते. असे असताना भारत जगातील इतर अनेक देशांच्या पेट्रोल, डिझेल आणि विमानांसाठी आवश्यक अतिशुद्ध पेट्रोल (एटीएफ) कसा पुरवू शकतो, असा अनेकांना प्रश्न पडत आहे.
तेल शुद्धीकरण क्षमता...
ड वरील प्रश्नाचे उत्तर भारताच्या तेल शुद्धीकरण क्षमतेत दडले आहे. कच्च्या इंधन तेलाचे रुपांतर पेट्रोल, डिझेल, विमानांचे इंधन अशा उपयुक्त पदार्थांमध्ये करण्याची भारताची क्षमता प्रचंड आहे. ज्या देशांमध्ये कच्चे तेल सापडते, त्या देशांपेक्षाही, तेल शुद्ध करण्याची भारताची क्षमता मोठी आहे, हे वैशिष्ट्यापूर्ण आहे.
ड कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांकडून भारत कच्चे इंधन तेल विकत घेतो. त्याचे रुपांतर उपयुक्त इंधनांमध्ये करतो. ही उपयुक्त इंधन भारत स्वत:ला आवश्यक त्या प्रमाणात स्वत:साठी उपयोगात आणतो. तसेच इतर अनेक देशांना निर्यात करतो. या क्षेत्रात त्यामुळेच भारत जगातील एक महासत्ताच बनला आहे.
हे कसे शक्य होते...
भारतात सार्वजनिक क्षेत्रात आणि खासगी क्षेत्रातही मोठी तेलशुद्धीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये कच्च्या इंधन तेलाचे रुपांतर पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांमध्ये केले जाते. भारताची ही क्षमता इतकी मोठी आहे, की अमेरिका आणि रशियापेक्षाही ती अधिक आहे. चीन हा देश मात्र यासंदर्भात भारतापेक्षा आघाडीवर आहे, असे बोलले जाते. पण चीन हे शुद्धीकरण केवळ स्वत:साठी करतो. त्याची निर्यात करत नसल्यामुळे भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारत कोणते तेल शुद्ध करतो...
कच्च्या इंधन तेलाचे दोन प्रकार असतात. ते ‘गोड’ तेल आणि ‘खारे’ तेल या नावांनी परिचित आहेत. ‘गोड’ तेल किंवा स्वीट ऑईल हे अत्यंत कमी प्रमाणात सापडते. या तेलात सल्फर किंवा गंधक आणि इतर काही अशुद्ध द्रव्ये यांचे प्रमाण अल्प असते. तर खारे तेल, जे जगात मोठ्या प्रमाणात सापडते, त्यात गंधक आणि अशुद्ध द्रव्ये यांचे प्रमाण मोठे असते. भारत हे खारे तेल शुद्ध करतो.
शुद्धीकरण प्रक्रियेत भिन्नता कोणती...
ही दोन्ही प्रकारची तेले एकाच पद्धतीने शुद्ध करता येत नाहीत. त्यासाठी दोन भिन्न प्रकारांच्या शुद्धीकरण प्रक्रिया अवलंबाव्या लागतात. गोड तेल त्वरीत शुद्ध होते. ते अधिक पातळ असल्यामुळे त्याच्यापासून प्रामुख्याने पेट्रोल आणि विमानाचे इंधन बनविले जाते. याउलट खारे तेल हे थोडे जाड असते. ते शुद्ध करण्यासाठी अधिक तापवावे लागते. तसेच त्यात अन्य काही द्रव्यांचे मिश्रण करावे लागते. खारे तेल शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान गोडे तेल शुद्ध करण्याच्या तंत्रज्ञानापेक्षा भिन्न असते. भारताने हे खारे तेल शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. परिणामी, हे तेल शुद्ध करण्यात भारत प्रवीण आहे. म्हणूनच भारतात तेल विशेष सापडत नसले, तरी भारतातून होणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवर अन्य अनेक लहान-मोठे देश अवलंबून आहेत. खारे तेल शुद्ध करण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागते. ती करणे सर्व देशांना जमत नाही. भारताने मात्र, ती गेल्या अनेक दशकांपासून केली आहे. त्यामुळे आज भारत अनेक देशांचा ‘इंधन आधार’ या क्षमतेमुळे बनलेला आहे. त्यामुळे भारत या क्षेत्रातील महासत्ता आहे.
कोणत्या देशांना निर्यात...
ड भारत जवळपास 20 देशांना डिझेल, पेट्रोल आणि विमानाच्या इंधनाचा पुरवठा करतो. यांच्यापैकी काही देशांना सातत्याने, तर काही देशांना त्यांची आवश्यकता असेल त्याप्रमाणे भारत निर्यात करतो. अनेक देश त्यांच्या आवश्यकतेच्या 40 ते 60 टक्के डिझेल आणि पेट्रोल भारताकडून विकत घेतात.
ड भारत अमेरिका, ब्राझील, संयुक्त अरब अमिरात, युरोपातील अनेक देश, सिंगापूर, मलेशिया, तुर्किये आणि ऑस्टेलिया हे भारताकडून डिझेल आणि पेट्रोल आयात करणारे प्रमुख देश आहेत. भारताकडून आवश्यकतेनुसार डिझेल आणि पेट्रोल आयात करण्यात युरोपची (जवळपास 60 टक्के प्रमाण) आघाडी आहे.
ड संयुक्त अरब अमिरात आणि मलेशिया हे देश कच्च्या इंधन तेलाचे उत्पादन करतात. तरीही हे देश भारताकडून आपल्या देशातील तेलाचे शुद्धीकरण करून घेतात. कारण, त्यांच्याकडे खाऱ्या तेलाचे शुद्धीकरण विशेषत्वाने केले जात नाही. परिणामी, तेल उत्पादक देश असूनही ते डिझेलसाठी भारतावर विसंबून आहेत.
सध्याच्या परिस्थितीतील महत्त्व
ड रशिया आणि युक्रेन युद्ध, तसेच इराण आणि अमेरिका युद्ध यांच्यामुळे जगातील तेलपुरवठा साखळ्या खंडित झाल्या आहेत. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे तेल महाग झाले आहे. अगदी अमेरिकेतही या इंधनांची किंमत एक वर्षभरात 30 ते 60 टक्क्यांनी वाढली आहे. अशावेळी भारताच्या तेलशुद्धीकरण केंद्रांचे महत्त्व वाढले आहे. युव्रेनने ज्यावेळी रशियाची तेल शुद्धीकरण केंद्रे हल्ला करून बंद पाडली होती, तेव्हा रशियाने आपल्या देशात उत्पादित होणारे कच्चे इंधन तेल भारतात पाठवून शुद्ध करून घेतले होते. आजही भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आपल्या आवश्यकतेसाठी जसे आयात करीत आहे, तसेच रशियालाही शुद्ध डिझेलचा पुरवठा भारत करीत आहे.
रशियाप्रमाणे अमेरिकाही...
ड रशियाप्रमाणे अमेरिकेलाही डिझेलची अत्याधिक आवश्यकता भासू लागली आहे. अमेरिकेत डिझेलची काही प्रमाणात टंचाई आहे. किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेलाही भारतात शुद्ध होत असलेल्या डिझेलची आवश्यकता आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. अमेरिकेने तसे प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. 
रुबिओ यांचा भारत दौरा
ड अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी नुकताच भारताचा दौरा केला आहे. या दौऱ्यात इतर मुद्द्यांप्रमाणेच डिझेल पुरवठ्याचाही मुद्दा चर्चिला गेला, असे वृत्त आहे. रुबिओ यांनी भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण केंद्रालाही भेट दिली. हे केंद्र गुजरातमधील जामनगर येथे असून ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाची क्षमता असणारे तेलशुद्धीकरण केंद्र मानले जाते. या केंद्राला अमेरिकेच्या मंत्र्यांनी भेट देणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक आहे. ही घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
अमेरिकेचे धोरण काय आहे...
ड अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या धोरणात अनेक परिवर्तने केली आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी त्यांनी रशियावर तेलनिर्बंध लागू केले. तथापि, त्यामुळे रशियाचे तेल जगाच्या बाजारात येण्याचे थांबल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. याचा फटका अमेरिकेलाही बसू लागल्यामुळे रशियावरील निर्बंध दोन महिन्यांसाठी उठविण्यात आले आहेत. याचा लाभ अप्रत्यक्षरित्या भारतासारख्या देशालाही होताना दिसून येत आहे.
ड अमेरिकेने दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या व्हेनेझुएला या देशाच्या तेलक्षेत्रावर नियंत्रण मिळविले आहे. व्हेनेझुएलात सौदी अरेबियापेक्षाही अधिक मोठा तेलसाठा आहे, असे तज्ञांचे मत आहे. तथापि, हे तेल अधिकच जाड आणि अशुद्ध आहे. त्यामुळे ते शुद्ध करण्यासाठी अमेरिका एक मोठे तेलशुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याची योजना साकारत आहे. अंबानी हे या क्षेत्रातील अव्वल उद्योगपती असल्यामुळे अमेरिकेत तेलशुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचे काम मुकेश अंबानी यांच्यावर सोपविण्यात येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे रुबिओ यांनी जामनगरचा दौरा केला होता, असेही बोलले जाते. याचाच अर्थ असा की खाऱ्या तेलाचे शुद्धीकरण करण्याच्या भारताच्या क्षमतेचा अमेरिकेलाही उपयोग करून घ्यायचा आहे. भारताचे या क्षेत्रातील महत्त्व किती आहे, याचे हे द्योतकच आहे.
तेलशुद्धीकरण महासत्ता हा शब्द कोणाचा...
ड भारत हा तेलशुद्धीकरण महासत्ता आहे, हे उद्गार अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मार्को रुबिओ यांचे आहेत. ते नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले असताना, त्यांनी भारतासंबंधी अशा अर्थाचे विधान केले आहे. यावरुनही भारताचे या क्षेत्रातील महत्त्व लक्षात यावे. सध्याच्या काळात हे महत्त्व अधिकच वाढलेले आहे.
भारताची क्षमता संख्येत...
ड खारे तेल शुद्ध करणाऱ्या भारतातील प्रमुख केंद्रांची संख्या 23
- सार्वजनिक क्षेत्रातील तेलशुद्धीकरण केंद्रे 19
- खासगी क्षेत्रातील तेलशुद्धीकरण केंद्रे 3
- संयुक्त क्षेत्रातील तेल शुद्धीकरण केंद्रे 1
खारे तेल शुद्ध करण्याची भारताची क्षमता 27 कोटी टन
भारताची इंधन निर्यात वजनात 6.50 कोटी टन
- भारताची डिझेल निर्यात 4 कोटी टन
- भारताची पेट्रोल निर्यात 2 कोटी टन
- भारताची विमान इंधन निर्यात 50 लाख टन
ड इंधन निर्यातीतून भारताचे उत्पन्न 8,500 कोटी डॉलर्स (साधारणत: 8 लाख कोटी रुपये) मात्र, येथे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, की या उत्पन्नातील बराचसा भाग हा कच्चे तेल आयात करण्यात खर्च करावा लागतो. हे तेल शुद्ध करण्यासाठी भारत जे बिल लावतो, ते कमीच असते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
ड तेलशुद्धीकरणातील क्षमता वाढ
2014 मध्ये भारताची तेलशुद्धीकरणाची क्षमता 21 कोटी टन इतकी होती. पुढच्या 12 वर्षांमध्ये ती 27 ते 28 कोटी टनांपर्यंत पोहोचली आहे. याचाच अर्थ असा की गेल्या 12 वर्षांमध्ये ती जवळपास 33 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते.
निर्यातीतील ‘हीरा’
ड भारताच्या इंधन निर्यातीची तुलना हिऱ्यांच्या निर्यातीशी केली जाते. ज्या प्रमाणे भारतात कच्चे इंधन तेल कमी सापडते, पण शुद्ध इंधनाची निर्यात त्या तुलनेत मोठी आहे, तसेच हिऱ्यांच्या निर्यातीसंबंधातही घडते. भारतात कच्चे हिरे खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात सापडत नाहीत. पण तरीही भारताची हिऱ्यांच्या निर्यातीत भारत जगात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण, भारतात कच्च्या हिऱ्यांना चमक देण्याचे कौशल्य असणारे कारागिर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जगातील मोठ्या कंपन्या कच्चे हिरे भारतात आणून भारतीय कारागिरांकडून त्यांना पैलू पाडून घेतात. भारतातील अनेक कंपन्या जगात कच्च्या हिऱ्यांची खरेदी करून भारतात त्यांना पैलू पाडून जगात विक्री करतात. त्यामुळे भारतात हिऱ्यांचे उत्पादन कमी असूनही त्यांची निर्यात मोठी होते. तसेच कच्च्या इंधन तेलासंबंधातही होते. पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात तुलनेते मोठी आहे.
निष्कर्ष
भारत तेल उत्पादक देश मोठ्या प्रमाणात नसला, तरी शुद्धीकरण करणारा मोठा देश आहे. अनेक देश भारताच्या पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून आहेत.
भारताकडून शुद्ध इंधन घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया हे मेठे देश आणि युरोपातील अनेक देशांचाही समावेश आहे. शेजाऱ्यांनाही पुरवठा केला जातो.
खाऱ्या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे विशेष तंत्रज्ञान भारताकडे असल्याने आणि त्याची शुद्धीकरणाची क्षमता मोठी असल्याने अनेक देश भारतावर विसंबून.
तेल शुद्धीकरण क्षेत्रात खासगी क्षेत्राला वाव दिल्याने क्षमता वाढ झाली मोठ्या प्रमाणात. निर्यातीतही खासगी कंपन्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात लक्षणीय.
- अजित दाते
