छत्रपती शहाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण !
राजाराम महाविद्यालयात श्रीमंत शाहू छत्रपतींच्या हस्ते कार्यक्रम : चित्रकार शशांक पाटील यांची कलाकृती
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील राजाराम महाविद्यालयात सोमवारी छत्रपती शहाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते अनावरण सोहळा झाला. राजाराम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे चित्रकार शशांक उर्फ भाई पाटील यांनी छत्रपती शहाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे.
महाविद्यालयातील प्राचार्याच्या केबिनजवळ भिंतीवर दर्शनी असे छत्रपती शहाजी महाराज यांचे तैलचित्र लावण्यात आले. सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. यास्मिन अत्तार, माजी मानद सचिव शशिकांत पाटील, हेमंतबापू पाटील, श्रीकांत सावंत, संजीव खाडे, प्रवीण खडके, संजय तोरस्कर, संजय सावंत, रिमा पाटील-शेळके, डॉ. अंजली पाटील, डॉ. संजय पाठारे, प्रा. नीता लाड, डॉ. रघुनाथ कडाकणे, प्रा. मिलिंद दीक्षित यांच्यासह आजी, माजी राजारामीयन, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
शाहू छत्रपतींना एनसीसीची मानवंदना
श्रीमंत शाहू छत्रपती यांचे आगमन होताच राजाराम महाविद्यालयाच्या एनसीसीच्या कॅडेटस्नी त्यांना मानवंदना दिली. प्राचार्या डॉ. अत्तार यांनी महाविद्यालयच्या कार्य आणि विस्ताराची माहिती शाहू छत्रपतींना दिली.
कोल्हापूर संस्थानचे अधिपती छत्रपती शहाजी महाराज 1932 साली राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत होते. माजी विद्यार्थी असताना त्यांचे छायाचित्र महाविद्यालयात नव्हते. एकदा चर्चेवेळी युवराज संभाजीराजे यांनी आपले आजोबा छत्रपती शहाजी महाराजांबद्दलची ही खंत बोलून दाखविली होती. त्यानंतर माजी राजारामीयन असणाऱ्या शशांक उर्फ भाई पाटील यांनी छत्रपती शहाजी महाराज यांचे तैलचित्र हुबेहुब साकारले. संभाजीराजे यांना दाखविले. ते त्यांना आवडले. त्यानंतर तैलचित्र अनावरणाचा सोहळा शाहू छत्रपतींच्या हस्ते झाला.
कोल्हापूर : संस्थानकालीन परंपरा असलेल्या राजाराम महाविद्यालयात सोमवारी छत्रपती शहाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्या डॉ. यास्मिन अत्तार, श्रीकांत सावंत, डॉ. अंजली पाटील, डॉ. नीता लाड, चित्रकार शशांक उर्फ भाई पाटील, माजी मानद सचिव शशिकांत पाटील, हेमंतबापू पाटील, संजय सावंत आदी.