अधिवेशनकाळात अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सूचना : सुवर्णविधानसौधमध्ये पूर्वतयारी बैठक, तयारीबाबत पाहणी
बेळगाव : सुवर्णविधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे सर्व समित्यांनी लक्ष देऊन जबाबदारीने कार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. सुवर्णविधानसौधमध्ये गुरुवार दि. 5 रोजी झालेल्या हिवाळी अधिवेशन पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 9 डिसेंबरपासून पुढील दहा दिवस राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा बेळगावात येणार आहे. या सर्वांची व्यवस्था जबाबदारीने पहावी. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सुवर्णविधानसौधच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी, तसेच कर्मचारी वर्गासाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था चोखपणे व्हावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
छायाचित्र प्रदर्शन
1924 मध्ये बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्णविधानसौधमध्ये छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांना ‘गांधी भारत’ छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी अनुकूल होण्याच्या दृष्टीने तयारी करावी. सुवर्णविधानसौधमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संगणक आणि इंटरनेट व्यवस्था समर्पकपणे कार्यरत रहावी यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांनी अधिवेशन काळात सतर्क रहावे. कोणत्याही कारणास्तव शिष्टाचाराचे उल्लंघन होणार नाही, याची दखल घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., विशेष भूसंपादन आयुक्त हर्ष शेट्टी यांसह विविध समित्यांचे अध्यक्ष व अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी सुवर्णविधानसौध परिसरातील तयारी, स्वच्छता व संपर्क व्यवस्थेची पाहणी केली.