अधिकाऱ्यांकडून रोहयो मजुरांची चौकशी-कागदपत्रंाची पाहणी
अगसगे ग्रा. पं.मध्ये रोहयोतील जॉब कार्डधारकांना काम न देता मशिनरी लावून केल्याची तक्रार
वार्ताहर/अगसगे
अगसगे ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये जॉब कार्ड असणाऱ्या मजुरांना काम न देता संपूर्ण काम शंभर टक्के मशिनरी लावून केले आहे. त्यामुळे जॉब कार्ड असणाऱ्या ग्रामस्थांवर अन्याय झाला आहे, असे निवेदन दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी जि. पं. कडे केला होता. त्या संदर्भात ता. पं. अधिकाऱ्यांनी अगसगे ग्रा. पं.ला तिसऱ्यांदा भेट देऊन रोहयो मजुरांची चौकशी करून संपूर्ण कागदपत्रांची पाहणी केली व तीन दिवसात मेटी (रोहयोतील मजुरांचा गट प्रमुख) यांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याची सूचना ता. पं. अधिकारी बी. डी. कडेमनी यांनी केली.
शुक्रवार दि. 4 रोजी गावातील समुदाय भवनमध्ये रोजगार हमी योजनेतील मजुरांची बैठक बोलवण्यात आली होती. श्री गणेश मंदिरपासून ते गावच्या तलावापर्यंत रोजगार हमी योजनेमधून सुमारे 26 लाख रुपये खर्च करून कच्चा रस्ता निर्माण करण्यात आला आहे. हा रस्ता बनवताना जॉब कार्डधारक मजूर न लावता पूर्ण प्रमाणात काम ट्रॅक्टर, जेसीबी, टिप्पर व इतर वाहने वापरून काम मशीनद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे या कामांमध्ये गैरप्रकार घडला आहे. त्या कामाची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून याची रक्कम परत शासनाला जमा करावी, असे निवेदन दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी 10 जानेवारी 2024 रोजी जिल्हा पंचायतकडे लेखी तक्रार केली होती. सध्या हे प्रकरण जिल्हा ओम्बूड्समन न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाला पुरावे सादर करण्यासंदर्भात ता. पं. अधिकारी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायतला भेट देऊन कागदपत्रांसह जॉबकार्ड मजुरांचा तपास करीत आहेत. मात्र अद्याप त्यांना या संदर्भात काही कागदपत्रांची शहानिशा झाली नसल्याने पुन्हा ते तीन दिवसानंतर ग्रामपंचायतला भेट देणार आहेत. त्यामुळे या कामात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शिवपुत्र मैत्री यांनी केला आहे.
प्रथम 10 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामपंचायतला भेट देऊन प्राथमिक तपास केला होता. यावेळी देखील सबळ पुरावे ग्रामपंचायतने दिले नाहीत. त्यानंतर 27 मार्च 2024 ला दुसऱ्यांदा भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली. मात्र यावेळी देखील काही कामांचे फोटो व इतर कागदपत्रांची पाहणी केली व त्यानंतर शुक्रवार 4 एप्रिल रोजी तिसऱ्यांदा ग्रामपंचायतला भेट दिली. यामुळे हे प्रकरण आणखी किती दिवस असेच चालणार आणि केव्हा न्यायालयाचा आदेश येणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
समुदाय भवनमध्ये बैठक
रोजगार हमी योजनेतील महिला मजूर उपस्थित राहिल्याने ग्रामपंचायतमध्ये जागा अपुरी पडू लागली. यामुळे समुदाय भवनमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी महिला मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही मजूर मात्र कामानिमित्त हजर होते. अभियंता मुर्गेश यकंची यांनी हजेरी घेऊन त्यांची स्वाक्षरी घेतली व तुम्ही काम केले की नाही, याबाबत प्रत्येक गटातील कामाची माहिती मेटी यांनी लेखी स्वरूपात तीन दिवसात द्यावे, असे ता. पं. अधिकारी बी. डी. कडेमनी यांनी सूचना केली. ता. पं. अधिकाऱ्यांसह ग्रा.पं.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व रोजगार हमी योजनेतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आमच्याकडे व्हिडिओ-फोटो पुरावे
आपण सतत अन्यायाविरुद्ध व गोरगरीब ग्रामस्थांसाठी आंदोलन करीत आहोत व कोणावरही अन्याय झाल्यास आपण सहन करणार नाही. सुमारे 26 लाख रुपयांचे काम जॉब कार्ड असणाऱ्या कामगारांकडून करून घेणे आवश्यक होते. मात्र यामध्ये जॉब कार्डधारकांना काम न देता मशिनीद्वारे केले आहे. त्यामुळे रोहयो कामगारांवर अन्याय झाला आहे. त्या अन्याया विरोधातच आपण लढत आहोत. तुम्ही सत्य परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडा. अन्यथा पुढील कारवाई झाल्यास आपण याला जबाबदार नाही, अशी सूचना दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवपुत्र मेत्री यांनी केली.