गुंजी ग्रा. पं.जमाबंदी बैठकीत अधिकारी धारेवर
विकासकामे बिले न काढताच केल्याचा आरोप : अधिकाऱ्यांसह पाहणी करण्याच्या मागणीमुळे उडाला गोंधळ
वार्ताहर/गुंजी
येथील ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या जमाबंदी कार्यक्रमात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या. काही कामे न करताच बिले काढल्याचा आरोपही करण्यात आल्यामुळे अधिकारी आणि सदस्यांची नागरिकांना उत्तरे देताना दमछाक झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष गुरव होते. पीडीओ प्रीती पत्तार यांनी स्वागत करून सभेचा उद्देश सांगितला. संगणक ऑपरेटर विलास पाटील यांनी वर्षभरात झालेल्या कामांचा तपशील योजनांप्रमाणे वाचून दाखविला. यातील रोहयोतील तीन कामांना नागरिकांनी आक्षेप नोंदविला. यापैकी दोन कामे निकृष्ट दर्जाचे तर दुसरे काम झालेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सदर कामे नोंद करून जमाबंदी कार्यक्रमानंतर त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. या कामाचे फोटो आणि कागदपत्रे नागरिकांनी दाखविण्यास सांगितली असता त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या कामाविषयी संशय बळावल्याने नोडल अधिकाऱ्यांसमक्ष पाहणी करावी, अशी नागरिकांनी मागणी केल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र कार्यक्रमानंतर याची पाहणी करण्यात येईल, असे सांगितल्याने ग्रामस्थ शांत झाले.
निधी उपलब्ध, पण कामे नाहीत
ग्रा.पं.च्या जमाबंदी अहवालावरून अनेक योजनांमध्ये निधी उपलब्ध असूनही पंचायतीने रोहयो व्यतिरिक्त कोणतीच कामे घेतली नसल्याने याचा जाबही उपस्थित पंचायत सदस्यांना विचारण्यात आला. मात्र काही सदस्यांनी मूकबधिराची भूमिका पार पाडल्याचे दिसून येत होते. तर काहींना नामोल्लेख करून जागे करावे लागल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती.
विश्वकर्मा योजनेसाठी पैशांची मागणी
सरकारच्या विश्वकर्मा योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याची तक्रार सभेत अनेकांकडून करण्यात आली. मात्र सदर मागणी कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या खर्चासाठी असल्याचे सांगण्यात आल्याने उपस्थितांना धक्काच बसला. यानंतर या विषयावर बोलता येणार नाही, अशी शक्कल लढवून सारवासारव करण्यात आली.
‘जलजीवन’च्या कामावर आक्षेप
येथील युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे यांनी जलजीवन योजनेतील कामावर आक्षेप नोंदविला.तसेच या ठिकाणी केवळ वीस ते पंचवीस नळ कनेक्शन जोडणी करून लाखो ऊपये खर्च दाखविल्याचे स्पष्ट केले. मात्र सदर योजनाही ग्राम पंचायतची नसून आपल्याला त्याबद्दल माहिती नाही, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.सदर योजनेचे काम अर्धवट आहे. मात्र ग्रा.पं.ला हस्तांतरित कसे करण्यात आले, असा प्रश्न विचारला असता वरिष्ठांच्या दबावामुळे ते हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळफेक होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते. त्यामुळे जमाबंदी हा कार्यक्रम केवळ औपचारिकता आहे की काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या कार्यक्रमात काही पंचायत सदस्यांनी न येणेच पसंत केले तर काहींनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष व सदस्य दीपक देसाई, पंकज कुट्रे व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. नोडल अधिकारी म्हणून खानापूर नरेगा कार्यनिर्वाहक अधिकारी रूपाली बडकुंद्री होत्या. दीपक घाडी यांनी आभार मानले.