For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरमुरी कचरा डेपोच्या नियोजनावरून मनपा बैठकीत अधिकारी धारेवर

10:45 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुरमुरी कचरा डेपोच्या नियोजनावरून मनपा बैठकीत अधिकारी धारेवर
Advertisement

पुढील बैठकीत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना हजर राहण्याची सूचना : विविध विषयांवर चर्चा

Advertisement

बेळगाव : तुरमुरी कचरा डेपोमध्ये दिवसाला किती टन कचरा जातो, याचे नियोजन कसे केले जाते, याबाबत माहिती विचारली असता त्याची योग्यप्रकारे उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पुढील बैठकीला कचरा डेपोची निविदा घेतलेल्या रॅमकी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्येच बोलवावे, अशी सूचना आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. महानगरपालिकेची आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. यावेळी कचरा डेपोच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महिन्याला नियोजनासाठी 38 ते 40 लाख रुपये कामगारांना वेतन दिले जात आहे. मात्र योग्यप्रकारे त्या ठिकाणी काम चाललेले नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये संपूर्ण आढावा घेण्यात आला. मात्र समाधानकारक उत्तरे आली नसल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीच्या तसेच बुधवारच्या बैठकीला ते अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा डेपोमध्ये किती वाहने दररोज कचरा नेतात, याची नोंद योग्यप्रकारे केली जात नाही. रजिस्टरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. एकूणच बुधवारची बैठक अधिकाऱ्यांना धारेवर धरणारीच ठरली. शहरामध्ये सुलभ शौचालयांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे शहराच्या दक्षिण आणि उत्तर विभागामध्ये दोन सार्वजनिक शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रभाग स्वच्छता करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी स्वच्छता केली गेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढत चालल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. याचबरोबर फॉगिंग मशीनचा वापर करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा त्याचाही वापर करावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

Advertisement

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांचे हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 3 हजार 795 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती दिली. मात्र याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले नाही. इतर कुत्र्यांचेही निर्बिजीकरण करण्याची गरज असल्याचे सांगत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवकांनी बैठकीत केली. भरत शर्मा या ठेकेदाराचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर नव्याने निविदा काढणे गरजेचे होते. मात्र त्यांच्याच मुलाला ते काम दिले आहे. हे कायद्याच्या चौकटीत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी प्रथम त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यानंतर त्यांनी जर नकार दिला तर इतरांना ठेका दिला पाहिजे, अशी माहिती दिली. कायदा सल्लागारांच्या या वक्तव्यानंतर काही अधिकाऱ्यांनी नियमानुसारच आम्ही ठेका दिल्याचे सांगितले. हवे तर बैठकीत ठराव करून इतरांना ते काम द्यावे, असे सांगण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेची वाहने सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या जागेमध्ये उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. जनतेच्या तक्रारी वाढल्या आहेत. एपीएमसी रोडवरील संकुलनाच्या तळघरातच ती वाहने पार्किंग करावीत, अशी सूचना अध्यक्षांनी केली. यावेळी नगरसेवक संदीप जिरग्याळ, शाहीदखान पठाण, रमेश मैलुगोळ, श्रेयश नाकाडी, खुरशिदा मुल्ला, रेश्मा कामकर, कौन्सिल सेक्रेटरी महेश जे., आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपातीलच स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता

महानगरपालिकेतील स्वच्छतागृहामध्ये स्वच्छता नसल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी आरोग्य निरीक्षकांना धारेवर धरण्यात आले. मुख्य कार्यालयामध्येच जर अस्वच्छता असेल तर कार्यालयाला दंड कोण ठोठावणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला. यामुळे या बैठकीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. पर्यावरण अभियंत्यांनी तर स्वच्छता करण्याचे काम आता मीच करू का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.

Advertisement
Tags :

.