शासकीय जागा लाटणाऱ्यांच्या टोळीत वरीष्ठ अधिकारी सक्रीय; शिवसेना उपनेते संजय पवार यांचा आरोप
राजकीय इर्ष्येत केवळ विकासकांमाची घोषणाबाजी
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील मोक्याच्या शासकीय जागा लाटणाऱ्यांच्या टोळीत वरीष्ठ शासकीय अधिकारीही सक्रीय झाले आहेत. जागा लाटण्याच्या प्रकरणात अधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग पाहता ते कोल्हापूरात शहराच्या विकासासाठी नव्हे तर स्वत:च्या विकाससाठी येत असल्याचा आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केला. तसेच राजकीय इर्ष्येतून केवळ विकासकामांच्या घोषणा सुरु आहेत. पण प्रत्यक्षात या विकासकामांना सुरुवात केलेली नाही. मग या विकास कामांचा निधी गेला कुठे असा प्रश्नही पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
उपनेते पवार म्हणाले, संभाजीनगर परिसरातील विभागीय क्रीडा संकुल, शालीनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिया यासह अन्य काही मोक्याच्या खुल्या जागा लाटण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून झाला. आता कोल्हापुरची अस्मिता असणाऱ्या रंकाळा तलावाच्या परताळ्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या खुला जागा हडपण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांना आता शासकीय अधिकारीही मदत करत आहेत. जागा लाटण्याच्या प्रकरणात हे अधिकारी जेवढे सक्रीय असतात त्याच पद्धतेने त्यांनी शहरातील विकास कामांसाठीही सक्रीय राहणे आवश्यक आहे.
राजकीय इर्ष्येतून केली जाणारी विकास कामांची घोषणा आणि शासकीय अनास्थामुळे आज कोल्हापूर शहराची पुरती वाताहात झाली आहे. 100 कोटींच्या रस्त्यांची घाईगडबडीने घोषणा केली पण अद्यापही रस्त्यावर डांबर पडलेले नाही. शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु असून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. चित्रनगरी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह यांची विकासकामे प्रलंबित पडली आहेत. राजकीय व शासकीय अनास्थेमुळे शहरातील अनेक विकास कामे प्रलंबित पडली असून शहराची विद्रुपीकरण सुरु आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ते प्रलंबित प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांना विचारणा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, धरणग्रस्तांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला शासकीय अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. धरण उभारण्यासाठी या लोकांच्या जमिनी घेतल्या, त्याजागी धरण उभारले, त्यामध्ये पाणीही साठले पण अद्यापही या लोकांना त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्यासमवेत धरणग्रस्तांची भेट घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.
देवणे, घाटगे यांचे लोकसभेसाठी नाव
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि माजी आमदार संजय घाटगे यांना उमेदवारी देण्याबाबतची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी केली आहे. उमेदवारी, जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी लोकसभा निवडणुकीबाबत मातोश्रीवरुन जो काही निर्णय येईत त्यानुसार जिल्ह्यातील शिवसैनिक कामाला लागतील असे पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोल्हापुरात
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखिल लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान त्यांचा कोल्हापूर दौर असेल,असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.