पोलीस स्थानकात ‘या रावजी, बसा भावजी...’
मटका-जुगारी अड्डेचालकांसाठी पोलिसांच्या पायघड्या : अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात मटका व जुगारी अड्डे उदंड झाले आहेत. गैरधंद्यांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना देऊनही काही अधिकारी मटका, जुगारी अड्डाचालकांना थारा देत आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईविषयी आणखी काही किस्से उघडकीस आले असून मटका, जुगारी व्यवसायातील दोन मोठ्या माशांना एफआयआर दाखल न करताच सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेनकनहळ्ळी येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांना अटक केली होती. यासंबंधी पोलीस आयुक्तांनी पत्रकही प्रसिद्धीस दिले होते.
ही कारवाईच मुळात संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून मटका व जुगारी व्यवसायातील आणखी काही बडी धेंडेही या अड्ड्यावर होती. मात्र, त्यांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. बाळू व विकी यांना पोलीस स्थानकात आणून काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. जुगारी अड्ड्यावरून लाखो रुपये जप्त करून केवळ 53 हजार 600 रुपये कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत. ही गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचूनही अधिकारी कोणतीच कारवाई करीत नाहीत. त्यामुळे संशयाचे वलय वाढले आहे. मटका व जुगारी व्यवसायातील बाळू हे नाव प्रत्येक पोलीस स्थानकात सन्मानाने घेतले जाते. बाळू व विकी यांची सुटका करण्यासाठी मोठा व्यवहार झाला आहे. या सर्व जुगाऱ्यांना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणण्यात आले होते.
केवळ काही जणांवर एफआयआर दाखल करून बाकीच्यांची सन्मानाने सुटका करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याची तसदीही घेत नाहीत, असे दिसून आले आहे. बेळगाव शहर व उपनगरात मटका, जुगार जोरात सुरू आहे. खासकरून एका बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अड्डे मोठ्या प्रमाणात थाटले आहेत. मटका व जुगारी अड्डे चालविण्यावरून गोळीबार, खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. आता गैरधंदे चालविण्यासाठी ज्यांच्यात संघर्ष सुरू आहेत, त्यांचेच अड्डे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या व्यवसायावरून टोळीयुद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली असून काही अड्डेचालकांना पोलीस अधिकाऱ्यांनी खुली सूट दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.