अधिकाऱ्यांनी वेळेला महत्त्व द्यावे
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे : इंजिनिअरिंग विभागाच्या कार्याला अचानक भेट
बेळगाव / प्रतिनिधी
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज कार्यालयाला वेळेत हजर रहावे. नागरिकांच्या समस्या वेळेत निकालात काढण्यात याव्यात अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. स्थानिक कार्यालयांना राहुल शिंदे यांनी सोमवारी अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली. पंचायत राज खात्याच्या इंजिनिअरिंग खात्याला भेट देऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेळेचे महत्त्व पटवून दिले.
वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईचा इशारा
अधिकाऱ्यांनी कार्यालयाला वेळेत हजर राहून आलेल्या कामांचा वेळेत निपटारा करावा. कोणतेही काम प्रलंबित ठेवण्यात येऊ नये. वेळेत काम पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा ही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी इंजिनिअरिंग विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली. सर्व अधिकार्यांनी वेळेत हजर राहावे. याबरोबरच कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा अशी सूचना केली.
यानंतर त्यांनी जवळच असणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांच्या हजेरीची पाहणी केली. बायोमेट्रिक हजेरी पाहून अधिक्रायांशी चर्चा केली. एफ टी के चा वापर करून पाण्याची गुणवत्ता तपासणी बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पंचायत राज खाते उपविभागाचे कार्यकारी अभियंता आनंद बनगर, शशिकांत नाईक, सोमशेखर आदवणी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.