मोबाईल रेंजसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची भटकंती
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठातील मुख्य इमारतीत मोबाईलला रेंज नसल्याची तक्रार अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून आल्यानंतर विद्यापीठाने जिओचे वायफाय फ्रीमध्ये सुरू केले आहे. या वायफायचा पासवर्डही सगळ्यांना माहित आहे. तरीदेखील कामाच्या वेळेत अचानक एखादा फोन आला तर रेंज नसल्याचे कारण पुढे करीत काही अधिकारी, कर्मचारी विद्यापीठ परिसरात मोबाईलवर बोलत फिरत असतात. तर दुसरीकडे कामानिमित्त आलेले विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालयीन कर्मचारी साहेबांची वाट पाहात कार्यालयाबाहेर ताटकळत बसलेले असतात. अशा कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करणार? असा सवाल विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठ प्रशासनाचे जवळपास बऱ्यापैकी कामकाज ऑनलाईन मुडवर आले असले तरी अनेक कामासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना विद्यापीठात यावे लागते. परजिल्ह्यातून, खेड्या-पाड्यातून येवूनसुध्दा संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारीच जागेवर नसतील तर कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न संबंधीतांना पडलेला असतो. विद्यापीठ प्रशासनाने वारंवार परिपत्रक काढून सूचना देवूनसुध्दा अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत विद्यापीठ परिसरात फिरताना दिसतात. मग कुलगुरूंच्या परिपत्रकाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शनिवार 15 मार्च रोजी विद्यापीठाची अधिसभा झाली. तरीदेखील अनेक विभागांचे कर्मचारी सुट्टीवर गेल्याने पूरक कागदपत्रे अधिसभा सदस्यांना त्वरीत उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी आल्या. अधिसभा असूनही संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिलीच कशी?
शिवाजी विद्यापीठात मोबाईलला रेंज येण्यासाठी अनेकजण कार्यालयातील खिडकीजवळ उभारलेले दिसतात. तर काहीजण विद्यापीठ परिसरासह मुख्य कँटीनमध्ये बसलेले असतात. दुपारी 2 ते 3 या वेळेत जेवनाची सुट्टी असते, परंतू कर्मचारी दीड, पावणेदोन वाजताच कार्यालयाची दार बंद करीत जेवन करतात. सुट्टीच्या वेळेत मात्र शतपावली करण्यासाठी विद्यापीठ परिसरात फेऱ्या मारत असतात. अनेकजण तर एखाद्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एकत्रित येवून गप्पा मारत बसलेले असतात. दुसरीकडे मात्र बंद कार्यालय पाहून कामानिमित्त आलेले विद्यार्थी कार्यालयाबाहेर थांबलेले असतात. काही व्यक्तींनी जाब विचारला असता महत्वाच्या बैठकांमध्ये असल्याचे सांगितले जाते. यावर विद्यापीठ प्रशासन काय भुमिका घेणार? अशी विद्यापीठ वतुळात चर्चा सुरू आहे.
- पुन्हा परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना व कारवाई होईल
जीओच्या वायफायने विद्यापीठ सुसज्ज आहे. प्रत्येकाला दिवसाला वनजीबी डेटा फ्री वापरता येतो. रेंजची अडचण आली तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लँडलाईनचा वापर करावा. लँडलाईनवरून कोठेही फोन लावता येतो. कामाच्या वेळेत फिरू नये अशा सूचना यापुर्वी दिल्या आहेत. तरीही कोणी फिरत असतील तर त्यांना पुन्हा परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना देवून योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. पी. एस. पाटील (प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)