2 सहकाऱ्यांच्या हत्येनंतर अधिकाऱ्याची आत्महत्या
दिसपूर: आसामच्या नागाव जिल्ह्यात एका सीआरपीएफ अधिकाऱ्याने स्वत:च्याच दोन सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्याने अन्य एका सहकाऱ्याला जखमी केले आणि मग आत्महत्या केली आहे. ही घटना नागावच्या कटिमारी येथील 34 बटालियन कॅम्पमध्ये घडली आहे. सेवेवर तैनात बल्लहानी प्रेमाबारम यांनी स्वत:च्या सहकाऱ्यांवर गोळीबार केलयाची माहिती नागावच्या पोलीस उपअधीक्षक परिमिता सरकार यांनी दिली आहे.
सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यावर प्रेमाबारम यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली होती, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गोळीबारात विष्णूप्रसाद बघेल आणि रामनवल सिंह यादव यांचा मृत्यू झाला आहे. तर गोविंद श्र्रीपुल हा जवान जखमी झाला आहे. श्रीपुल यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीआरपीएफ आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅम्पचा दौरा करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.