346 रुपयांत ऑफिस, लंच, केवळ जॉब नाही
जगात अनेक लोकांना स्वत:च्या आयुष्यात हवे ते सर्व मिळत नसते. परंतु काही लोक संघर्षाला हसत-हसत सामोरे जातात. तर काही लोक स्वत:च्या अपयशामुळे खचून जातात. अशा लोकांसाठी चीनच्या एका कंपनीने अजब मार्ग शोधला आहे. चीनच्या हुबेई प्रांतात बेरोजगार लोकांना अनोखी संधी मिळत आहे. ज्या लोकांना नोकरी गमवावी लागली आहे, त्यांना कंपनीकडून एका ऑफर अंतर्गत जगासमोर नोकरदार म्हणून राहण्याची संधी दिली जात आहे. याकरता या लोकांना कंपनीला पैसे द्यावे लागतात आणि कंपनी त्यांना स्वत:चा मान-सन्मान कायम राखण्याची संधी देते.
चीनमध्ये लोकांना नोकरी गमवावी लागणे मोठी गोष्ट नाही. या संकटातही संधी शोधू पाहणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हुबेई प्रांतातील एक कंपनी लोकांना अनोखी ऑफर देत आहे. हे लोक केवळ 346 रुपये खर्च करून दररोज एका ठिकाणी येऊ शकतात, जेथे त्यांना ऑफिसची अनुभूती मिळेल. तेथे येऊन ते ऑफिसप्रमाणे बसू शकतात, लंच करू शकतात आणि लोकांना आपण बेरोजगार नसल्याचे दाखवू शकतात. हुबेई प्रांतात खुले झालेले एक ऑफिस स्पेस असून तेथे नोकरी नसल्याने असहज असलेल्या लोकांना या मानसिक स्थितीपासून वाचविण्याचे काम करतो असा दावा कंपनीने केला आहे.
या ऑफिस स्पेसमध्ये सामान्य ऑफिसप्रमाणे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहण्याची संधी मिळते. याकरता या लोकांना सुमारे 30 युआन खर्च करावे लागतात. जर कुणी लेदरयुक्त बॉस चेअरवर बसून फोटो काढून घेऊ इच्छित असेल आणि त्याला मित्र अन् परिवाराला आपण चांगली नोकरी करत आहोत असे दाखवून द्यायचे असेल तर 50 युआन म्हणजेच 606 रुपये खर्च करावे लागतील. या सर्व्हिसविषयी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशाप्रकारच्या दिखाव्याची गरज नाही. हा पलायनवादाला चालना देणारा प्रकार असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर अशा सुविधेमुळे मानसिक तणाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो असे अन्य युजरचे सांगणे आहे.