वैश्यवाडा हनुमान मंदिरात गणरायाला ५,१२१ मोदकांचा नैवेद्य
सावंतवाडी -
वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वैश्यवाडा येथील भाविकांमार्फत ५,१२१ मोदकांचा नैवेद्य श्रीगणेशचरणी अर्पण करण्यात आला.पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. त्यानंतर दुपारी महाआरती करण्यात येऊन श्रीगणेशचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी श्री. गौरेश मिशाळ यांनी श्रींची पूजा केली. गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून त्यात महावीर चेंडके, सुभाष आळवे आणि परिवार, धोंडी दळवी, शरद सुकी, महादेव गावडे, मंगेश परब, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी, वैभव म्हापसेकर वगैरे भजनाचे मानकरी आहेत, तर लघुरुद्र सेवा नरेश जीवने, पंचखाद्य प्रसाद डॉ. दादा केसरकर यांचे कडून होणार आहे.
भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक
मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रींची भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून यात देवीचा गोंधळ ही संकल्पना राहणार असून विविध कार्यक्रम तसेच भजन आदींचा समावेश असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर उत्सव कमिटी, वैश्यवाडातर्फे कऱण्यात आले आहे.