श्री देव बोडगेश्वराला फळांचा हार अर्पण
म्हापसा : श्री देव बोडगेश्वराच्या 90 व्या जत्रोत्सवाला काल रविवारी मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून येत्या 19 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गत सालच्या तुलनेत यंदा अलोट गर्दी पाहायला मिळाली. उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. म्हापसाच्या नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी पालिकेच्यावतीने सेवा दिली आहे. पालिकेचे कामगार कार्यरत होते. यंदाचे वैशिष्ट्या म्हणजे श्री बोडगेश्वर सेवेकरी मंडळ म्हापसाच्यावतीने 45 हजार रुपये खर्चून श्री देव बोडगेश्वराला विविध फळांनी सजविलेला मोठा हार अर्पण करण्यात आला आहे. हा आकर्षक असा फळांनी सजविलेला हार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या हारासाठी सर्व फळांचा वापर करण्यात आला आहे. हा हार देवाला अर्पण केल्याबद्दल देवस्थान समितीने श्री देव बोडगेश्वर सेवेकरी मंडळाचे मानले आहे.