हिंदू देवतांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई करा
हिंदू एकता मंचाचा पोलिस मुख्यालयात आक्रोश वॉरन आलेमाव, गिरीश चोडणकर, गोविंद शिरोडकर यांच्या अटकेची मागणी
त. भा. प्रतिनिधी
पणजी : सोशल मीडियावर हिंदू देवतांचा अपमान करणारे, आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संशयितांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी करीत हिंदू एकता मंचने पोलिस मुख्यालयात आक्रोश केला. जय श्री राम, भारत माता की जय अशा घोषणा देत पोलिस मुख्यालय दणाणून सोडले. कडक पोलिस बंदोबस्तात शेकडो संख्येने आंदोलक पोलिस अधिकारी आणि तिसवाडी मामलेदार यांच्यासमोर आपला आक्रोश व्यक्त करीत होते. वॉरन आलेमाव, गिरीश चोडणकर आणि गोविंद शिरोडकर यांना त्वरित अटक करा अन्यथा आता हिंदू गप्प बसणार नाही, वेळ पडल्यास गोवा बंद करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रत्येकवेळी हिंदूंना गृहित धरले जाते. अल्पसंख्याक म्हणून एका विशिष्ट समाजाची पाठराखण केली जाते, ते लोक मात्र हिंदू देवतांबाबत घाणेरडी विधान करतात. गौतम खट्टर यांनी एका सभेत सत्य मांडले तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली, मात्र हे लोक नियमित अपमानास्पद आणि आक्षेपार्ह सोशल मीडियावर विधाने करतात, त्यांच्यावर कोणतीच कारवाई का केली जात नाही ? काही लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करून दोन ते अडीच महिने झाले, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही आदी प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. जे झाले ते डोक्यावरून गेले आता हिंदू गप्प बसणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
येथील आझाद मैदानावर जन आक्रोश सभा झाल्यानंतर आंदोलकांनी पोलिस मुख्यालयाकडे मोर्चा वळविला. यावेळी सत्यविजय नाईक, शैलेंद्र वेलिंगकर, संतोष सिंह राजपूत, गोविंद चोडणकर, जानवी प्रभुदेसाई, सिद्धार्थ मांद्रेकर, अॅड. शैलेश गावस यांच्यासह अनेक नेते आणि शेकडो हिंदूप्रेमी सहभागी झाले होते.
आंदोलन अधिक तीव्र केले जाईल
आंदोलनादरम्यान, शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले की, जर पोलिसांनी संशयितांना अटक केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. अॅड. रोशन सामंत आणि अॅड. पुष्पराज नावेलकर यांच्यासह इतर वक्त्यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सरकारने हिंदू हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि समाजाला अशा अपमानांपासून वाचवण्यासाठी कायदा आणला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आंदोलकांनी गोविंद शिरोडकर, गिरीश चोडणकर आणि वॉरन आलेमाव यासारख्या व्यक्तींची नावे घेऊन त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली. हिंदू श्रद्धांप्रति आदर राखण्यासाठी आणि अनादराच्या पुढील घटना टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचा नेत्यांनी आग्रह धरला.
आझाद मैदानावरील सभेनंतर आंदोलकांनी आझाद मैदानापासून पणजी येथील पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वारावर गटाला थांबवण्यात आले आणि सुमारे बारा प्रतिनिधींना त्यांच्या मागण्या मांडणारे निवेदन उपअधीक्षकांना सादर करण्यासाठी आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
आंदोलकाच्या नेत्यांनी हिंदू धर्माशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही केली. हिंदू भावना दुखावणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. याव्यतिरिक्त, आंदोलकांनी हिंदू इतिहास उघडकीस आणण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी काही विशिष्ट भागांचे उत्खनन करण्याची मागणी केली. सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आणि हिंदू श्रद्धांप्रति आदर पाळण्यासाठी अशी पावले उचलणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.