Satara news | महापुरुषांबाबत आक्षेपार्ह कमेंट; साताऱ्यात तणाव, युवकावर गुन्हा दाखल
साताऱ्यात आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणावरून तणाव
सातारा - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे गुरुवारी सकाळी सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटताच संतप्त समाजबांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर धडक देत संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
लखीमपूर येथील पुतळ्याच्या विटंबनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओवर सचिन पाटील (वय ३३, रा. प्रतापगंज पेठ, राधिका चौक, सातारा) याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह कमेंट केली होती. ही बाब समाजबांधवांच्या निदर्शनास येताच शहरात संतापाची लाट उसळली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अशा कृतींमुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले आणि त्यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक झालेल्या जमावाने घोषणाबाजी करत संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमावाशी संवाद साधला. त्यांनी उपस्थितांना आश्वासन देताना स्पष्ट केले की,दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य आणि “महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.”पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनानंतर समाजबांधवांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन पाटील याच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलीस ठाण्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर त्याने माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर शहरात शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.