For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफ-बिट...टेनिसचा नवा अवतार...‘वन पॉईंट स्लॅम’

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑफ बिट   टेनिसचा नवा अवतार   ‘वन पॉईंट स्लॅम’
Advertisement

ऑस्ट्रेलियन ओपन ही नेहमीप्रमाणं यावेळीही आपल्या दर्जेदार टेनिसमुळं चर्चेत राहिलीय. पण यंदा त्याच्या जोडीला सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते ‘वन पॉईंट स्लॅम’नंही....व्यावसायिक खेळाडू नि हौशी टेनिसपटू यांची सांगड घालणारा हा आगळावेगळा प्रकार नेमका काय आहे त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...

Advertisement

  • सिडनीच्या 29 वर्षीय टेनिस प्रशिक्षकानं ऑस्ट्रेलियन ओपनमधील ‘वन पॉइंट स्लॅम’चं विजेतेपद आणि 1 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं बक्षीस अकल्पनीयरीत्या आपल्या खात्यात जमा केलं...यादरम्यान त्यानं जॅनिक सिनर, कार्लोस अल्काराझ, इगा स्वायटेक नि कोको गॉफ यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या स्पर्धकांना मागं टाकलं...
  • मात्र याचा खरा फायदा ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ला झाला. कारण आयोजक मेलबर्न पार्कमध्ये चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अपारंपरिक मार्गांचा शोध घेत असताना या नवीन संकल्पनेनं जवळपास तीन तासांचा कालावधी खर्च होऊनही रॉड लेव्हर एरिनामध्ये प्रेक्षकांना खेचलं...
  • ही एक वेगळ्या प्रकारची बाद फेरीची स्पर्धा. यात प्रत्येक सामना फक्त एका गुणाचा राहतो आणि सर्व्हिस कोण करणार हे ठरवण्यासाठी प्रत्येक गुणापूर्वी ‘रॉक-पेपर-सिझर्स’चा खेळ खेळला जातो...गुण मिळविणारा विजेता पुढे जात राहतो...
  • हौशी खेळाडू जॉर्डन स्मिथनं या स्पर्धेचं विजेतेपद मिळविलं. तो एकेकाळचा अमेरिकी महाविद्यालयाचा खेळाडू आणि त्याचं एटीपी कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान होतं 1,141 वं. आता तो त्याच्या कुटुंबाच्या टेनिस अकादमीमध्ये काम करतो...
  • खरं तर ऑस्ट्रेलियन ओपननं गेल्या वर्षी पहिल्या ‘वन पॉइंट स्लॅम’चं आयोजन करून या  संकल्पनेची चाचणी घेतली होती. परंतु तेव्हा त्याचा बक्षीस निधी 60 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स होता आणि त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्व्हती...
  • त्यावेळी रशियाचा आंद्रे ऊबलेव्ह हा एकमेव अव्वल 10 मधील खेळाडू सहभागी झाला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत त्यानं एकमेव सर्व्हिस जाळ्यावर हाणल्यानं त्याचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला होता...त्यात 16 हौशी खेळाडू (15 ते 72 वयोगटातील आठ पुऊष व आठ महिला) 16 व्यावसायिक टेनिसपटूंविरुद्ध खेळून ऑस्ट्रेलियन प्रोफेशनल ओमर जासिकानं ही स्पर्धा जिंकली होती...
  • मात्र यंदा ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’नं 1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस देण्याचा घेतलेला निर्णय या संकल्पनेबद्दल कुतुहल वाढवून गेला...या स्पर्धेत एक ब्रेकफास्ट टेलिव्हिजन होस्ट, एक माजी जॉकी, 50 लाखांहून अधिक यूट्युब सबक्राइबर असलेला एक व्हिडिओ गेम इन्फ्लुएन्सर यांचाही सहभाग होता...
  • तथापि, सर्वांत मोठा स्टार तैवानी मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक जे चाऊ होता. त्याची संपत्ती 10 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. त्यानं स्पर्धा जिंकल्यास 1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस धर्मादाय संस्थेला दान करण्याचं वचन दिलं होते, परंतु तो पहिल्याच फेरीत एका बिनतोड सर्व्हिसवर गारद झाला...
  • यंदा सहभागी झालेल्या 48 खेळाडूंपैकी निम्मे खेळाडू सध्याचे व्यावसायिक टेनिसपटू होते. उर्वरित सारे सेलिब्रिटी आणि पात्रता फेरीतून आलेले खेळाडू. त्यापैकी एक स्मिथ, जो सिडनी गटातून पात्र ठरला...
  • स्मिथनं आपल्या मोहिमेची सुऊवात लॉरा पिगोसीवर विजय मिळवून केली आणि तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिनरनं सर्व्हिसमध्ये डबल फॉल्ट करून त्याला प्रसिद्ध विजय मिळवून दिला. पुढं स्मिथनं जागतिक क्रमवारीत सहावं स्थान भूषविणाऱ्या अमांडा अनिसिमोव्हासह पेद्रो मार्टिनेझचं अन् अंतिम फेरीमध्ये 117 व्या स्थानावर असलेल्या जोआना गारलँडचं आव्हान मोडीत काढलं...

- राजू प्रभू

Advertisement

Advertisement
Tags :

.