For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माशेलात ‘ऑफ ड्युटी’ पोलिसांची गुंडागर्दी

11:10 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
माशेलात ‘ऑफ ड्युटी’ पोलिसांची गुंडागर्दी
Advertisement

फास्ट फूड मालकाला मारहाणप्रकरणी तिघे पोलीस निलंबित : फोंडा स्थानकाचा हवालदार समीर फडते मुख्य संशयित

Advertisement

फोंडा : माशेल येथील ‘टमी ट्रिट’ फास्ट फुड सेंटरचे मालक विराज माशेलकर यांना खाकीचा धाक दाखवित तीन पोलीस व त्यांच्या 6 साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल सोमवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा नोंदविला आहे. मुख्य संशयित समीर फडते हा फोंडा पोलीस स्थानकात हवालदार म्हणून कार्यरत आहे. विराज माशेलकर यांना खाकीचा धाक दाखऊन समीरने आपल्या अन्य 8 जणांच्या साथीने हे गुंडप्रवृत्ती कृत्य केले आहे. या घटनेनंतर समीर फडते व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. फक्त एएनसी मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल आकाश नावेलकर हा म्हार्दोळ पोलिसांच्या हाती लागलेला आहे. सदर घटना रविवार 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराज माशेलकर यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकात याप्रकरणी रितसर तक्रार दाखल केली आहे. समीर फडते  हा विराजच्या फास्ट फूड व्यवसायातील बिझनेस पार्टनर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विराज हा नोकरी करीत होता. तो समीरचा कोविड काळापुर्वीचा मित्र आहे. समीर, समीरची पत्नी व विराज यांनी मिळून हा फास्ट फुडचा व्यवसाय थाटला होता. कोविडकाळात विराज याची नोकरी सुटल्याने त्याने पूर्णवेळ फास्ट फूडच्या व्यवसायात लक्ष घातले. सहाय्यक म्हणून असलेल्या समीरच्या पत्नीला त्याने या व्यवसायातून फारकत घ्यायला सांगितले. त्यानंतर विराज हा पूर्णवेळ व्यवसायात रमला होता. व्यवसाय तेजीत असल्याने बऱ्यापैकी कमवित होता.

Advertisement

धोका ओळखून बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

विराज हा फास्टफुडमध्ये उशिरा रात्रीपर्यंत पार्सलच्या ऑर्डर घेऊन बऱ्यापैकी कमावत असल्याचे पोलीस समीर फडते याला पाहवत नसे. या कारणावरून समीरने आपल्या मित्रांच्या सहाय्याने ‘पोलीस हेल्पलाईन 100’ नंबरवर तक्रार करून फास्ट फूड बंद पाडण्याचे प्रयत्नही केले होते. कैकवेळा फोंडा व म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रारी करून प्रकरण मिटवण्यात येत असे. परंतू त्यानंतर सतर्क झालेल्या विराजने आपल्या आस्थापनात हाय रेझ्युलेशन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले होते. समीर पोलीसी खाकीचा वापर करुन भांडण करणार आणि तो एक दिवस तावडीत सापडणार हे विराज याला पक्के ठाऊक होते.

विराजला दिला मुका मार

विराजला मारहाण करताना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीत आढळून येऊ नये म्हणून मुका मार समीरने विराजला दिलेला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराज हा यावेळी जास्त प्रतिकार करताना दिसत नाही. ही घटना सीसीटीव्ही बंदिस्त असून विराज याला धक्काबुक्की करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत संशयित दिसत आहेत. विराजच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने प्रथम बेतकी येथील आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर अधिक उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले. सोमवारी सकाळी त्याला घरी पाठविण्यात आले. त्यानंतर त्याची जबानी म्हार्दोळ पोलिसांनी नोंद करून घेतली.

आकाश नावेलकरची कसून चौकशी

संशयित आकाश नावेलकर याचीही महिला उपअधीक्षक अर्शी आदी यांच्या मार्गदर्शनाखाली कसून चौकशी केली असून त्याने विराज याला मारहाण करण्यात आपला हात नसून आपण फास्ट फूडच्या बाहेर उपस्थित असल्याची कबुली दिली आहे.

तिघा पोलिसांसह अन्य 3 मित्र, 3 अज्ञातांविरोधात गुन्हा

म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या संशयितामध्ये मुंख्य संशयित समीर फडते (42, बेतकी) आहे. तसेच आकाश नावेलकर (पोलीस शिपाई एएनसी), मितेश गाड (आयआरबी पोलीस), सुप्रेश, मोहीत गाड (टॅक्सीचालक) हे चारजण नावेली-सांखळी येथील, अमित साळुंखे (आमोणे-सांखळी) त्याशिवाय अन्य 3 अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संशयित खाकीतील गुंड म्हणून परिचित...

निलंबीत पोलीस समीर फडते हा ओल्ड गोवा पोलीस स्थानकात कार्यरत असताना सहाय्यक उपनिरीक्षकाला मारहाणप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी तो दोषी आढळला होता. सद्या तो फोंडा येथील उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या सेवेत होता. उपअधीक्षकांची बदली झाल्यानंतर तो दीर्घ रजेवर आहे. तसेच दुसरा निलंबीत पोलीस आकाश नावेलकर हाही यापुर्वी पणजी येथील गाजलेल्या प्रकरणात पर्यटकांकडून लाच घेत असताना सापडला होता. तिसरा निलंबित आयआरबी पोलीस नितेश गाड याचा समावेश आहे. घटनेची सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर तिघांही संशयित पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती म्हार्दोळ पोलिसांनी दिली. म्हार्दोळ पोलिसांनी याप्रकरणी नऊही संशयिताविरोधात भां.दं.सं.च्या 143, 147, 452, 504, 324, 506(2) कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.