For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफ-बिट...‘किंग’ कोहली !

06:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑफ बिट   ‘किंग’ कोहली
Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुमाकूळ घातला तो झंझावाती द्विशतक फटकावणाऱ्या शुभमन गिलनं...पण म्हणून थिऊअनंतपूरम येथील पहिल्या लढतीत विराट कोहलीनं बजावलेल्या पराक्रमाचा ठसा पूसला जाणार नाही...त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधील आपली विक्रमी कामगिरी कायम राखत 50 षटकांच्या प्रकारात 15 हजार धावांचा टप्पा ओलांडला...अशी झेप घेणारा तो महान सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसराच खेळाडू...

Advertisement

  • वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या चेंडूवर चौकार लगावत विराट कोहलीनं 15 हजार धावाच्या क्लबमध्ये पाऊल ठेवलं...हे साध्य करताना त्यानं सचिन तेंडुलकरलाही मागं टाकलं. कारण विराटनं ही कामगिरी आपल्या 303 डावांत (315 सामने) पूर्ण केली, तर तेंडुलकरला त्यासाठी लागले होते 377 डाव (387 लढती)...
  • ही भरारी घेण्यासाठी सामना केलेल्या चेंडूंचा विचार केल्यासही कोहली अधिक जलद ठरलाय. त्यानं 15 हजार 950 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला, तर तेंडुलकरला त्याकरिता लागले होते 17 हजार 528 चेंडू...याचाच अर्थ हा स्तर गाठण्यासाठी त्यानं सचिनच्या तुलनेत 9 टक्के म्हणजे 1578 चेंडू कमी घेतले..
  • कोहलीनं अनेक बाबतीत तेंडुलकरच्या पुढं जाण्यात यश मिळविलंय. त्याची सरासरा 59.01, तर ‘लिटल मास्टर’ची 44.83. सचिनची ती सरासरी त्याच्या सर्वोत्तम काळात (1995 ते 2011) उत्कृष्ट मानली जात असे...
  • कोहलीचा 94 पेक्षा अधिक असलेला ‘स्ट्राईक रेट’ही तेंडुलकर (86) पेक्षा सरस...15 हजार धावांचा टप्पा गाठला तेव्हा सचिनच्या नावावर होती 41 शतकं. विराटच्या तुलनेत ती 14 कमी...
  • विराटनं यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार, 12 हजार, 13 हजार आणि 14 हजार धावांचा टप्पा सर्वांत जलदरीत्या गाठणारा खेळाडू म्हणून आपली नोंद केलीय...
  • या लढतीत केवळ 74 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत पुन्हा एकदा विराटनं ‘चेजमास्टर’चा किताब सार्थ ठरविला...हे त्याचं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वांत जलद शतक, तर एकंदरित पाहता एकदिवसीय क्रिकेटमधील 55 वं...क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला इतकी शतकं ‘वनडे’मध्ये झळकावता आलेली नाहीत...
  • यासोबतच कोहलीनं ‘अ श्रेणी’ क्रिकेटमधील आपलं 60 वं शतक पूर्ण केलं आणि याबाबतीत देखील तेंडुलकरशी बरोबरी साधली...
  • विराटनं आपले अर्धशतक पूर्ण केलं ते षटकार खेचून आणि त्यानंतर शतक गाठतानाही त्याचीच पुनरावृत्ती केली...त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाच डावात अर्धशतक नि शतक या दोन्ही गोष्टी षटकार मारून पूर्ण करण्याची ही पहिलीच खेप...
  • त्यानं 157.95 च्या स्ट्राईक रेटनं अवघ्या 88 चेंडूंमध्ये शानदार 139 धावांची नाबाद खेळी करताना 10 चौकार आणि 9 षटकार लगावले...एका ‘वनडे’ डावात कोहलीनं खेचलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक षटकार....
  • एकंदरित सर्व प्रकारांतील विराट कोहलीचं हे 86 वं आंतरराष्ट्रीय शतक...या कामगिरीमुळे तो सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचलाय...
  • तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय सामन्यांत 49 व कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं असून कोहलीच्या खात्यात आहेत ती टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1, कसोटी क्रिकेटमध्ये 30 अन् एकदिवसीय सामन्यांत 55 शतकं...खेरीज त्यानं ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये नऊ टी-20 शतकं झळकावलीत. परंतु त्यांचा आंतरराष्ट्रीय शतकांत समावेश होत नाही...

- राजू प्रभू

Advertisement

Advertisement
Tags :

.