For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑफ-बिट’ : ‘रिटायर्ड आऊट’ची रणनीती...

06:00 AM Apr 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘ऑफ बिट’   ‘रिटायर्ड आऊट’ची रणनीती
Advertisement

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये एका प्रकारानं नवा नसून सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय...‘रिटायर्ड आऊट’...रणनीतीच्या अनुषंगानं त्याचा वापर करण्यात आलाय...काय आहे हा प्रकार अन् त्यात नि ‘रिटायर्ड हर्ट’मध्ये काय फरक  ?...

Advertisement

  • मंगळवारी पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान ‘सीएसके’नं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला ‘रिटायर्ड आउट’ करण्याचा डाव खेळला...49 चेंडूंत 69 धावा केलेल्या कॉनवेनं 18 व्या षटकात क्रीझ सोडली अन् त्याच्या जागी रवींद्र जडेजा आला. सीएसकेला 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 13 चेंडूंत 49 धावा हव्या होत्या. हा निर्णय दुखापतीमुळं घेतलेला नव्हता. अर्थात हा डावपेच खेळूनही ‘सीएसके’ कमी पडला आणि त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला ती गोष्ट वेगळी...
  • त्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध मुंबई इंडियन्सनं तिलक वर्माच्या बाबतीत याच डावपेचाचा वापर केला होता...204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईतर्फे पाचव्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या तिलक वर्मानं 23 चेंडूंत 25 धावा काढल्या होत्या. पण 19 व्या षटकात त्यानं परतीची वाट धरली ती मिशेल सँटनरसाठी जागा खाली करण्याच्या उद्देशानं. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही अन् मुंबईला सामना गमवावा लागला तो 12 धावांनी...
  • त्यामुळं या आयपीएल हंगामात खेळाडू ‘रिटायर्ड आउट’ होण्याचे प्रकार सुरुवातीच्या टप्प्यातच दोनदा पाहायला मिळालेत. त्यामुळं त्याविषयीचं अन् ‘रिटायर्ड हर्ट’पेक्षा तो वेगळा कसा याविषयीचं क्रिकेट रसिकांचं कुतूहल जागं झालंय...क्रिकेटमध्ये दुखापतीमुळं किंवा आजारपणामुळं मैदान सोडणाऱ्या फलंदाजाला ‘रिटायर्ड हर्ट’ (‘रिटायर्ड नॉट आउट’ असंही त्याला म्हटलं जातं) गणलं जातं...
  • महत्त्वाचं म्हणजे ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या खेळाडूला तंदुरुस्त असल्यास पुढं मैदानात परतण्याची मुभा राहते. मात्र संघानं सर्व गडी गमावण्यापूर्वी त्यानं पाऊल ठेवणं आवश्यक. सांख्यिकीदृष्ट्या अशा फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतल्यावेळी बाद मानलं जात नाही आणि मैदानात परत आल्यावर त्याचा डाव पुढं चालू राहतो...
  • याउलट ‘रिटायर्ड आऊट’ हा एक धोरणात्मक निर्णय. फलंदाज दुखापतीमुळं नव्हे, तर स्वेच्छेनं मैदान सोडतो आणि तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. सामन्याच्या परिस्थितीला अनुकूल असा नवीन फलंदाज आणण्यासाठी या डावपेचाचा वापर केला जातो...
  • ‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वांत प्रथम या पद्धतीनं पॅव्हेलियनमध्ये परतला होता तो रविचंद्रन अश्विन. 2022 च्या हंगामात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या सामन्यात त्यावेळी राजस्थान रॉयल्सतर्फे खेळणाऱ्या अश्विनला दहाव्या षटकात सहाव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. अश्विननं 23 चेंडूत 28 धावा केल्या. पण फक्त 10 चेंडू शिल्लक असताना आणि राजस्थान 4 बाद 135 अशा स्थितीत असताना त्यानं ‘रिटायर्ड आउट’ होऊन रियान परागला संधी देणं पसंत केलं. ही चाल कामी येऊन राजस्थाननं 6 बाद 165 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी ‘एलएसजी’ला 8 बाद 162 वर रोखून विजय मिळविला होता तो तीन धावांनी...
  • अशा पद्धतीनं बाद झालेले अन्य खेळाडू म्हणजे पंजाब किंग्सचा अथर्व तायडे (दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना, 2023) अन् गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन (मुंबई इंडियन्सविरुद्धची लढत-2023)...
Advertisement
Tags :

.