‘ऑफ-बिट’ : बॅडमिंटनमधील नवी तारका...
06:00 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
भारतीय बॅडमिंटनमध्ये एक नवी तारका उदयाला आली असून तिनं नुकत्याच संपलेल्या अमेरिकन ओपनमध्ये जबरदस्त धडक मारत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय...जरी तिला किताब जिकता आलेला नसला, तरी तिनं मोठी झेप घेण्याची आपली क्षमता व्यवस्थित दाखवून दिलीय...अवघ्या 16 वर्षांची तन्वी शर्मा !
Advertisement
- नुकत्याच संपलेल्या अमेरिकन ओपनमध्ये महिला एकेरीत तन्वी शर्मानं संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शन घडवत सर्वांना चकीत केलं. या बिगरमानांकित खेळाडूनं चक्क जागतिक क्रमवारीत 23, 40, 50 आणि 58 व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंना हरवून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली...
- अंतिम फेरीत झालेल्या रोमांचक सामन्यात अव्वल मानांकित अमेरिकेच्या बेईवेन झांगकडून तिला 21-11, 16-21, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. परंतु तन्वीनं ‘बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन’च्या ‘वर्ल्ड टूर फायनल’मध्ये खेळलेली सर्वांत तऊण भारतीय खेळाडू बनून इतिहास रचलाय...
- तन्वी शर्माला 1 जुलै रोजी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची कनिष्ठ महिला एकेरी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं असून त्यामुळं तिच्याविषयी देशाला वाटणाऱ्या अभिमानात आणखी भर पडलीय...
- ‘मी माझ्या ‘एंड्युरन्स’वर काम केलंय आणि मला त्याचं फळ मिळालंय. मला स्वत:चा खूप अभिमान वाटतोय, पण अजून बरंच काही साध्य करायचंय. सुपर 750, 1000 व 500 स्पर्धांमध्ये मला या कामगिरीची पुनरावृत्ती घडवायचीय’, असं तन्वी नंतर म्हणाली...कनिष्ठ स्तर गाजविलेल्या या भारतीय बॅडमिंटनपटूनं एकही गेम न गमावता अंतिम फेरीत प्रवेश केला हे महत्त्वाचं...
- आता पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेची प्रतीक्षा करणाऱ्या तन्वीनं प्रतिस्पर्ध्यांना चकवून टाकणाऱ्या खेळण्याच्या शैलीच्या जोरावर आपल्याहून किती तरी वरच्या क्रमांकांवर वसलेल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवलं. अनेकदा तिनं प्रतिस्पर्ध्यांना जाळ्यानजीक येण्यास भाग पाडलं आणि नंतर क्रॉस कोर्ट स्मॅश लगावून अनुभवी खेळाडूंनाही बुचकळ्यात पाडलं...
- ‘तिच्यात सायना नेहवाल अन् पी. व्ही. सिंधू या दोघांचेही सर्वोत्तम गुण दडलेत’, असे उद्गार तन्वी शर्माचे प्रशिक्षक पार्क ताई-संग यांनी तिनं रौप्यपदक जिंकल्यानंतर काढले. पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलं होतं ते पार्क यांच्याच मार्गदर्शनाखाली. वरील ‘सुपर 300’ स्पर्धेत तन्वीनं केलेल्या कामगिरीचा त्यांना खूप अभिमान वाटतोय...
- पंजाबमधील होशियारपूर येथील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मास आलेल्या तन्वीचं यंदाचं ध्येय हे कनिष्ठ स्तरावरून झेप घेऊन एखाद्या बड्या वरिष्ठ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचं होतं. अंतिम फेरीतील पराभव तिला बोचतोय. ही गोष्ट तिच्या महत्त्वाकांक्षेबद्दल बरंच काही सांगून जाते...
- तन्वी शर्माची क्षमता वादातीत असून तिनं ठसा उमटविलेला असला, तरी त्यामागं कमी मेहनत दडलेली नाहीये. याकामी कुटुंबाचाही तिला जोरदार पाठिंबा मिळालाय. तन्वी व तिची बहीण 2016 ते 2021 दरम्यान हैदराबादमधील गोपीचंद अकादमीमध्ये शिष्यवृत्ती नसलेल्या प्रशिक्षणार्थी या नात्यानं धडे गिरवत असतानाही त्यांनी हार मानली नाही.
- ‘माझे पती सरकारी कर्मचारी आहेत आणि आम्ही तन्वीला राधिकासोबत हैदराबादमधील अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या शहरात राहणं सोपं नव्हे आणि त्यासाठी आम्हाला खूप खर्च करावा लागला’, असं स्वत: माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू राहिलेल्या तिच्या आईनं दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं...
- पी. व्ही. सिंधूला आदर्श मानणाऱ्या तन्वीला डोळ्यांसमोर दिसतंय ते 2028 चं ऑलिम्पिक...‘मला लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचंय’, ती म्हणते...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement