For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑफ-बिट’...पंतकडून विक्रमांचा सपाटा...

06:30 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ऑफ बिट’   पंतकडून विक्रमांचा सपाटा
Advertisement

श्रीलंकेतील कसोटी मालिकेत चमकलेल्यांमध्ये समावेश आहे तो रिषभ पंतचाही...त्यानं नुसती दोन अर्धशतकंच झळकावली नाहीत, तर त्याभरात काही विक्रमही मोडीत काढले...

Advertisement

  • यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतनं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलंय...परदेशातील किंवा तटस्थ मैदानांवरील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय यष्टिरक्षक बनण्याचा मान त्यानं मिळविलाय...सोमवारी कोलंबोत श्रीलंकेविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतनं ही कामगिरी केली.
  • 51 कसोटी नि 89 डावांमध्ये पंतनं 43.60 च्या प्रभावी सरासरीनं केल्याहेत त्या 3662 धावा...यासह त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (कसोटीत 2,496 धावा) मागं टाकलंय...पंत व धोनीखेरीज विदेशात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच प्रमुख यष्टिरक्षकांमध्ये समावेश आहे तो फाऊख इंजिनिअर (1,209), सय्यद किरमाणी (1,109) आणि किरण मोरे (901) यांचा...
  • कोलंबोतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळं पंतला मैदान सोडावं लागलं लागलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी असिथा फर्नांडोनं सारांश जैनला बाद करून श्रीलंकेला सहावं यश मिळवून दिल्यानंतर तो फलंदाजीसाठी उतरला. त्यानंतर ध्रुव जुरेलच्या साथीनं त्यानं डाव सावरला आणि संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं नेलं...
  • श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी आखूड टप्प्यांच्या चेंडूंचा मारा करत पंतची परीक्षा घेतली. सकाळच्या सत्रात त्याच्या खांद्यावर काही वेळा चेंडूही बसले.. अखेरीस 113 व्या षटकात फिरकीपटू कुशारा नुवानथाने 112 धावांची भागीदारी तोडली आणि रिषभ 63 धावांवर बाद झाला....
  • पण हा दुसरा दिवस रिषभ पंतसाठी विक्रमांच्या बाबतीत इतक्यापुरताच मर्यादित राहिला नाही...त्यानं आपली उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवताना ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या इतिहासातील देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा मानही मिळविला. याभरात त्यानं मुसंडी मारली ती शुभमन गिलच्या पुढं...
  • जागतिक कसोटी स्पर्धेत पंतच्या नावावर आता 42 कसोटी सामन्यांत 2,948 धावा जमा झाल्याहेत. तितक्याच सामन्यांत गिलनं काढल्याहेत त्या 2,917 धावा...भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर 2,716 धावांसह (40 कसोटी) आहे माजी कर्णधार रोहित शर्मा...त्यानंतर अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (50 सामन्यांत 2,675 धावा) अन् विराट कोहली (46 सामन्यांत 2,617 धावा) यांचा क्रमांक...भारताच्या सध्याच्या खेळाडूंपैकी यशस्वी जैस्वाल 30 कसोटी सामन्यांतील 2,588 धावांसह या यादीत पुढच्या स्थानावर विसावलाय...
  • हे कमी म्हणून की काय 28 वर्षीय रिषभनं ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला मागं टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलंय, दुसऱ्या कसोटीत या आक्रमक यष्टीरक्षकानं 89 चेंडूंत 70.79 च्या स्ट्राईक रेटनं धावा फटकावताना सहा चौकार नि दोन षटकार लगावले...
  • पहिल्या लढतीत कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार खेचणारा अवघा चौथा खेळाडू आणि पहिला भारतीय ठरलेल्या पंतच्या नावावर आता अवघ्या 52 कसोटींत 102 षटकार जमा झालेत. गिलख्रिस्टला 100 षटकार फटकावण्यासाठी लागले होते 96 कसोटी सामने...
  • या यादीत अव्वल दोन स्थानांवर विसावलेत इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स (122 सामन्यांत 138 षटकार) व न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम (101 सामन्यांत 107 षटकार)...
  • यावर्षी खेळलेल्या तीन कसोटीत पंतनं 62.25 च्या सरासरीनं 249 धावा केल्याहेत. यात तीन अर्धशतकांचा अंतर्भाव नि सर्वोत्तम धावसंख्या 81...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.