For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफ-बिट : भरवशाचा खेळाडू ते मार्गदशर्क

06:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑफ बिट   भरवशाचा खेळाडू ते मार्गदशर्क
Advertisement

केन विल्यमसन...न्यूझीलंडचा अत्यंत भरवशाचा अन् प्रचंड दर्जा आपल्या खेळातून दाखविणारा फलंदाज...तो इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या हंगामात झळकताना दिसेल. मात्र मैदानात आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना नव्हे, तर तो प्रथमच पाहायला मिळेल मार्गदर्शकाच्या भूमिकेत...

Advertisement

  • लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी घोषणा केलीय की, न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन आयपीएल 2026 च्या आधी त्यांचा नवीन ‘स्ट्रॅटेजिक’ सल्लागार म्हणून ताफ्यात सामील झालाय...
  • मागील हंगामात ‘एलएसजी’नं जागतिक क्रिकेटमधील काही मोठ्या नावांना करारबद्ध केलं होतं. लिलावात 27 कोटींच्या करारासह रिषभ पंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनल्यानं तो चर्चेचा विषय बनला होता. मात्र इतकं असूनही या मोसमात संघाच्या वाट्याला आलं ते सातवं स्थान. त्या निराशाजनक मोहिमेतून बाहेर सरून पुन्हा झेप घेण्याचा प्रयत्न लखनौ सुपर जायंट्सकडून चाललाय. विल्यमसनची निवड हा त्याचाच भाग...
  • विल्यमसन जागा घेईल ती झहीर खानची. भारताच्या या माजी वेगवान गोलंदाजानं गेल्या हंगामात ‘एलएसजी’चे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती...गोएंका यांच्यावर भुरळ पडलीय ती किवी स्टारचं शांत, संयमी नेतृत्व आणि रणनीतिक कौशल्याची. जागतिक स्पर्धांमध्ये न्यूझीलंडनं त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त कामगिरी करून दाखविण्यात त्याचा मोलाचा वाटा...आता ‘एलएसजी’मध्ये त्याची भूमिका मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासोबत संघाला आकार देण्याची असेल...
  • 35 वर्षीय विल्यमसन हा अजूनही सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असला, तरी  विविध लीगमधील संघांतर्फे वावरण्याची संधी शोधण्यासाठी त्यानं न्यूझीलंडच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय...
  • केननं त्याच्या शानदार कारकिर्दीत 105 कसोटी सामन्यांमध्ये 9 हजार 276 धावा आणि 173 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 हजार 236 धावा केल्या आहेत, त्याचा दर्जा, सरासरी आणि स्वभाव त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये सहज स्थान देऊन जातो...
  • 2019 आणि 2022 साली अनुक्रमे एकदिवसीय व टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळलेला केन विल्यसमन जागतिक कसोटी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिला होता...तो अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त झालेला नाही, परंतु या नवीन नियुक्तीमुळं ‘आयपीएल’मधील खेळाडू म्हणून त्याची क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा...
  • ‘आयपीएल’मध्ये 2 हजारांहून अधिक धावा जमविलेला विल्यमसन या स्पर्धेत एकूण 79 सामने खेळलाय. त्यापैकी बहुतेक सामन्यांत तो दिसला ‘सनरायझर्स हैदराबाद’चं प्रतिनिधीत्व करताना...
  • 2015 मध्ये त्यानं ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केलं ते सनरायझर्सकडूनच अन् 2016 साली त्या संघानं विजेतेपद पटकावलं त्यावेळी तो त्याचा भाग होता. दोन हंगामांनंतर विल्यमसनला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि ‘केन मामा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूनं 2018 च्या हंगामात हैदराबादला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्या स्पर्धेत त्यानं सर्वाधिक 735 धावा जमवत ‘ऑरेंज कॅप’ जिंकली होती...
  • विल्यमसनची गेल्या तीन हंगामांत मात्र मैदानावर फारशी उपस्थिती दिसली नाही. 2023 मध्ये त्याला गुजरात टायटन्सनं निवडलं, पण हंगामातील पहिल्या सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यानं स्पर्धेत पुढे कोणताही भाग घेतला नाही...2024 मध्येही तो गुजरातसोबतच राहिला आणि फक्त दोन सामने खेळला. मागील हंगामातील ‘आयपीएल’साठीच्या मेगा लिलावात त्याला कुणीही करारबद्ध करण्यात स्वारस्य दाखविलं नाही...
  • केन विल्यमसननं नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो या स्वरुपातील न्यूझीलंडचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. त्यानं 93 सामन्यांमध्ये 33.44 च्या सरासरीनं 2,575 धावा केल्या, त्यात 18 अर्धशतकांचा समावेश...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.