For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफ-बिट : ‘बॉल बॉय’ ते भारतीय संघ...

06:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑफ बिट   ‘बॉल बॉय’ ते भारतीय संघ
Advertisement

भारतीय फुटबॉल संघात नावं झळकतात ती प्रामुख्यानं गोवा, बंगाल, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब नि अलीकडच्या काळात ईशान्य भारतातली...आता त्यात जम्मू-काश्मीरच्या एका खेळाडूचा समावेश झालाय. ही तशी दुर्मिळच गोष्ट. शिवाय त्याचा ‘बॉल बॉय’ ते भारतीय संघापर्यंतचा प्रवासही उल्लेखनीय...

Advertisement

  • 2019 साली श्रीनगरमध्ये झालेल्या भारतीय एकादश आणि जम्मू-काश्मीर ऑल स्टार्स संघ यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यावेळी सुहेल अहमद बट्ट हा ‘बॉल बॉय’ म्हणून वावरला होता. तो दिवस त्याला अजूनही आठवतो...
  • ‘बॉल बॉय’ म्हणून मी गोलरक्षक अमरिंदर सिंगच्या गोलपोस्टच्या मागे उभा होतो. आता मी त्याच्यासोबत एकाच मैदानावर सराव करतोय, असं श्रीनगरच्या बेमिना प्रदेशातील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय बट्टला अभिमानानं नजरेस आणून दिल्याशिवाय राहवत नाही...सहा वर्षांपूर्वी बट्ट चेंडू आणून ज्या अमरिंदरला देत असे त्याच्यावरच तो सरावादरम्यान चेंडू फटकावू लागलाय...
  • फुटबॉलनं त्याला लहानपणीच आकर्षित केलं ते वडील फुटबॉल खेळत असल्यानं. त्याचे वडील अब्दुल्ला दिवसा मजुरी व भाजीपाला विक्री करायचे अन् सूर्यास्त झाल्यावर लांब अंतराचा प्रवास करून फुटबॉल सामने खेळायला जायचे. अब्दुल्ला यांना त्याच्या तीन मुलांपैकी दोन मुलं डॉक्टर झालीत याचा अभिमान आहे. त्याचबरोबर किमान एका मुलानं फुटबॉलमध्ये कारकीर्द घडविणं पसंत केल्याचा आनंदही...
  • सुहेल बट्ट 14 वर्षांचा असताना राज्य फुटबॉल अकादमीत सामील झाला. ‘काश्मीरमधील अनेक खेळाडूंप्रमाणं तो शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत आणि गोलक्षेत्रात चेंडूसाठी लढण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. तो खूप शिस्तबद्धही असून त्यानं कधीही प्रशिक्षण चुकवलं नाही’, या अकादमीचे प्रणेते व माजी फुटबॉलपटू मेहराजुद्दीन वाडू सांगतात...
  • पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळालेल्या सुहेलला भारताच्या बुधवारी झालेल्या थायलंडविऊद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यामुळं तो 80 च्या दशकातील अब्दुल मजीद काकरू आणि मुशीर अहमद, 2005 ते 2011 दरम्यान खेळलेला मेहराजुद्दीन वाडू आणि 2022 मध्ये वर्णी लागलेला दानिश फारूक बट्ट यांच्यानंतरचा राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळलेला जम्मू-काश्मीरचा पाचवा खेळाडू ठरलाय...
  • 2005 मध्ये सुनील छेत्रीनं भारताकडून पदार्पणात गोल केला होता तेव्हा सुहेल बट्ट फक्त दोन महिन्यांचा होता. आता या दिग्गज खेळाडूसोबत केवळ सरावच नव्हे, तर राष्ट्रीय संघात त्याच्यासोबत स्पर्धा करण्याचा अनुभव त्याला अद्भूत वाटतोय...‘छेत्री माझ्याशी बोलतो, मला शिकवतो. तो मला दररोज मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रेरणा देतो’, बट्ट म्हणतो...
  • सुहेल क्रिस्तियानो रोनाल्डोचा एक उत्कट चाहता...‘रोनाल्डो ही एक प्रेरणा आहे, कारण तो 41 व्या वर्षीही दमदार कामगिरी करतोय’, तो सांगतो...
  • 16 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळविण्यापासून ते वरिष्ठ संघात दाखल होईपर्यंत सुहेलची झपाट्यानं झालेली प्रगती ही आश्चर्यकारक नाही. 2022 मधील ‘गार्डियन’च्या जागतिक फुटबॉलमधील 60 सर्वोत्तम युवा प्रतिभांच्या यादीत त्याचं नाव समाविष्ट होतं...
  • गोलक्षेत्रात संघर्ष करण्याची त्याची शारीरिक क्षमता आणि मजबूत मानसिकतेमुळं त्याला इंडियन सुपर लीग विजेत्या मोहन बागाननं आपल्या गोटात ओढलंय. बट्टनं अद्याप त्याच्या क्लबसाठी एकही गोल केलेला नाही. परंतु एका विश्वासार्ह आघाडीपटूच्या शोधात भारतीय संघ असल्यानं प्रशिक्षक मानोलो मार्केझ श्रीनगरच्या या नवीन ‘स्ट्रायकर’कडे वळलेत...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.