ऑफ-बिट...जबरदस्त जिद्दीची कहाणी...
06:30 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शर्मिला धनखडनं नुकतंच ‘पॅरा-अॅथलेटिक्स’मध्ये भारताला राष्ट्रकुल खेळांतील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं...इथपर्यंतचा तिचा प्रवास हा विलक्षण अडचणींनी भरलेला राहिला. मात्र जिद्द, धैर्य नि कधीही हार न मानण्याची मानसिकता यांच्या जोरावर तिनं त्यातून सावरून यशोशिखरावर झेप घेतली...
Advertisement
- शर्मिला धनखडनं महिलांच्या ‘गोळाफेक एफ57’ प्रकारात विजय मिळवून सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पॅरा-अॅथलीट ठरण्याचा मान मिळविला...40 वर्षीय शर्मिलानं 9.81 मीटरची हंगामातील सर्वोत्तम गोळाफेक करत राष्ट्रकुल खेळांतील पॅरा-अॅथलेटिक्समधील पदकासाठी भारताची 20 वर्षांपासून चाललेली प्रतीक्षा संपवली...
- शर्मिला धनखडचा जन्म हरियाणातील महेंद्रगड जिह्यात एका गरीब कुटुंबात झाला. सुऊवातीपासूनच तिला अनेक आव्हानं नि संघर्षांचा सामना करावा लागला. वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओची लागण झाली, त्यामुळं उजवा पाय निकामी झाला. त्यात आई दृष्टिहीन व वडील शेतकरी. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण अशी स्थिती...
- सुऊवातीच्या दिवसांबद्दल बोलताना शर्मिला म्हणते, माझं आयुष्य कधीच सोपं नव्हतं...त्याहून अत्यंत वेदनादायक कालवधीचा तिला सामना करावा लागला तो विवाहानंतर...वयाच्या 19 व्या वर्षी तिचं लग्न झालं परंतु अमली पदार्थांच्या आहारी गेलेला पती तिला मारहाण व छळ करत असे. परिस्थिती जास्तच बिघडली ती दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर. एके दिवशी पतीनं तिला रात्रभर मारहाण केली आणि दोन मुलींसह घराबाहेर काढलं. त्यानंतर ती कायमची माहेरी परतली...
- आई-वडिलांनी तिला आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास मदत केली. पण पुढं तिच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणाशक्ती ठरला तो सहा वर्षांनंतर तिनं विवाह केलेला सबमर्सिबल पंपचा तंत्रज्ञ अजित सिंह...त्यानं धनखडला खेळाकडे वळण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन दिलं आणि ती प्रसिद्ध प्रशिक्षक टेक चंद व देवेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवू लागली...
- 34 व्या वर्षी शर्मिलानं ‘पॅरा-अॅथलेटिक्स’मध्ये पदार्पण करून चंदिगडमधील क्रीडा अकादमीमध्ये प्रवेश घेतला. ती ‘एफ57’ या गटात स्पर्धा करते. हा गट ज्यांच्या पायांत अपंगत्व किंवा कमी ताकद आहे अशा स्पर्धकांसाठी निर्माण करण्यात आलाय...
- 2021 च्या पॅरा-राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलेल्या आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेल्या शर्मिला धनखडनं सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर गोळाफेकपटू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. तिनं दुबईतील फझ्झा आंतरराष्ट्रीय पॅरा-अँथलेटिक्स स्पर्धेत उतरून गोळाफेकमध्ये सुवर्णपदक, तर थाळीफेकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती...
- सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुल खेळांत शर्मिलानं मिळविलेलं यश फार महत्त्वाचं. कारण बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांत आणि 2023 मधील हांगझाऊ आशियाई पॅरा-गेम्समध्ये या पॅरा-अॅथलीटला पदक थोडक्यात हुकलं होतं. तिथं ती अनुक्रमे चौथ्या नि पाचव्या स्थानावर राहिली. तसंच नवी दिल्लीत झालेल्या जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेतही तिच्या वाट्याला पाचवं स्थान आलं होतं...
- इतकं यश मिळवूनही शर्मिलापुढील आव्हानं संपलेली नाहीत. तिच्या क्रीडा कारकिर्दीला आधार देण्यासाठी कुटुबानं 2023 मध्ये रेवाडी येथील स्वत:चं घर विकलं आणि सध्या ते भाड्याच्या घरात राहताहेत...त्यातच ग्लासगो राष्ट्रकुल खेळांच्या एक वर्ष आधी तिनं आपल्या वडिलांना गमावलं...
- ग्लासगोमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर शर्मिला धनखड म्हणाली, ‘सुवर्णपदक हातात धरताना भारतातील प्रत्येक महिलेला आणि मुलीला माझा संदेश आहे...अत्याचाराविऊद्ध लढा द्या’ !
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement