For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धविराम चर्चा इराणने रोखली

06:44 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धविराम चर्चा इराणने रोखली
Advertisement

होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग पुन्हा बंद करण्याची तयारी : लेबनॉनवरील हल्ल्यांच्या विरोधात निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणने अमेरिकेसोबतची युद्धविराम चर्चा सध्या रोखली आहे. लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले थांबत नाही तोवर मध्यस्थांद्वारे अमेरिकेसोबत कुठलीच चर्चा होणार नसल्याचे इराणने जाहीर केले आहे. लेबनॉनमध्ये शांतता राखणे युद्धविरामाच्या महत्त्वपूर्ण अटींमध्ये सामील आहे. परंतु आता लेबनॉनसमवेत अनेक आघाड्यांवर या कराराचे उल्लंघन होत असल्याचे इराणचे सांगणे आहे. गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायलची सैन्य कारवाई त्वरित रोखण्याची आणि लेबनॉनच्या क्षेत्रामधून इस्रायलच्या सैन्याची पूर्ण माघार व्हावी अशी मागणी इराणने केली आहे. जोपर्यंत या मुद्द्यांवर आमची आणि आमच्या सहकाऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोवर चर्चा पुन्हा सुरू होणार नसल्याची भूमिका इराणने घेतली आहे.

Advertisement

इराण आणि त्याचे सहकारी होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग पूर्णपणे बंद करण्याच्या पर्यायावरही विचार करत आहेत. लाल समुद्रातील दक्षिण हिस्स्यात स्थित बाब अल-मंदेब सामुद्रधुनीतील कच्चे तेल वाहतूक रोखण्याचा विचारही इराणकडून केला जातोय. आमचे अधिकार पूर्णपणे सुरक्षित आहोत हा भरवसा जोपर्यंत निर्माण होत नाही तोवर अमेरिकेसोबत कुठल्याही कराराला मंजुरी दिली जाणार नसल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेकडून इराणचे सैन्यतळ लक्ष्य

अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या गोरुक शहर आणि केश्म बेटावर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले आत्मरक्षणाच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला. ही कारवाई इराणच्या आक्रमक हालचालींच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आली आहे. इराणने यापूर्वी आंतररराष्ट्रीय जलक्षेक्षात अमेरिकेचा एमक्यू1 ड्रोन पाडविला होता. अमेरिकेच्या सैन्याने इराणची हवाई सुरक्षा प्रणाली, एक ग्राउंड कंट्रोल स्टेशन अणि दोन वन-वे अटॅक ड्रोन्सना नष्ट केले आहे.

कुवैतमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला

कुवैतमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करत इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराणने डागलेली दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या सैन्याच्या सेंट्रल कमांडने केला आहे. दोन्ही क्षेपणास्त्रांना त्वरित इंटरसेप्ट करण्यात आले, या घटनेत अमेरिकेचा एकही सैनिक जखमी झाला नसल्याचे सांगण्यात आले.

इराणला जाणारे जहाज रोखले

अमेरिकेने इराणच्या दिशेने जाणारे आणखी एक मालवाहू जहाज रोखले आहे. 17 एप्रिलपासून आतापर्यंत इराणच्या दिशेने जाणारी 6 जहाजं अमेरिकेने रोखली आहेत.

ब्यूफोर्टवर इस्रायलचा कब्जा

इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये 900 वर्षे जुना ब्यूफोर्ट आणि आसपासच्या पर्वतांवर कब्जा केला आहे. ही मागील 26 वर्षांमधील इस्रायलची लेबनॉनमधील सर्वात मोठी कारवाई आहे. फ्रान्सने लेबनॉनमधील इस्रायलच्या वाढत्या सैन्य कारवाईवरून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.

चर्चा अधिक सुरक्षित मार्ग

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी चर्चा जारी आहे. युद्धाच्या तुलनेत चर्चा अधिक सुरक्षित मार्ग आहे आणि सध्या याच्याशिवाय अन्य कुठला पर्याय नाही. चर्चेतून समस्या त्वरित सुटणार नाही, परंतु हाच एक मार्ग आहे. चर्चेत विलंब होऊ शकतो किंवा काही अडथळे येऊ शकतात, तरीही ही पुढे सरकत असल्याचा दावा लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आउन यांनी केला आहे.

ईयूचे इस्रायलला आवाहन

युरोपीय महासंघाने (ईयू) इस्रायलला लेबनॉनमधील वाढती सैन्य कारवाई रोखण्याचे आवाहन केले आहे.  तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिण भागांमध्ये आणखी हल्ले करण्याचा आदेश दिला आहे. इस्रायलने लेबनॉनमधील सैन्य तणाव वाढणारी कारवाई बंद करावी. इस्रायलने लेबनॉनच्या लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा असे ईयूच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

इराणच्या हल्ल्यांची निंदा

कुवैतवरील इराणच्या हल्ल्यांची सौदी अरेबियाने निंदा केली आहे. इराणचा हल्ला हा कुवैतच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा आहे आणि आंतररराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याची टिप्पणी सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने केली आहे. अशाप्रकारच्या घटना क्षेत्रात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना कमकुवत करतात आणि तणाव वाढवत असल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे.

इराणची पुन्हा धमकी

-होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग पुन्हा बंद करण्याचा इराण करतोय विचार

-हुती बंडखोरांच्या मदतीने बाब अल-मंदेब बंद करण्याचे संकेत

-लेबनॉनमधील इस्रायलची कारवाई तातडीने रोखण्याची मागणी

-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणकडून कुवैतमधील तळ लक्ष्य

Advertisement
Tags :

.