For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडीशाचे ‘संस्थानिक’ तीन ‘पटनाईक’

06:12 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओडीशाचे ‘संस्थानिक’ तीन ‘पटनाईक’
Advertisement

भारतीय जनता पक्ष आणि डावे पक्ष वगळात भारतात सर्व राजकीय पक्षांमधील सर्वोच्च पदे विशिष्ट घराण्यांसाठीच असतात, हे सर्वपरिचित आहे. या घराण्यांमध्ये जन्मालाला आलेल्या व्यक्ती जणू त्या पक्षांचा संस्थानिक असल्याप्रमाणे वंशपरंपरागत पक्ष चालवितात. ओडीशा हे राज्यदेखील याला अपवाद नाही. या राज्यावर आतापर्यंत तब्बल 45 वर्षे दोन पटनाईक घराण्यांनी राज्य केले आहे. जानकी वल्लभ पटनाईक, बिजू पटनाईक आणि आता बिजू पटनाईकांचे पुत्र नवीन पटनाईक अशा तीन पटनाईकांनी या राज्याचे मुख्यमंत्रीपद 45 वर्षे सांभाळले आहे. उरलेल्या 32 वर्षांमध्ये मात्र, या राज्याने 11 मुख्यमंत्री पाहिले आहेत. या 11 मुख्यमंत्र्यांपैकी फार कमी जणांनी मुख्यमंत्रीपदावर पाच वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे ओडीशा हे राज्य पटनाईक घराण्याचे ‘संस्थान’ म्हटले जाते.

Advertisement

‘करन’ जातीची घराणी

पटनाईक घराणी ही करन या जातीची आहेत. ओडीशात मोहंती घराणीही याच जातीची आहेत. या जातीची लोकसंख्या या राज्यात अवघी 2 टक्के आहे. मात्र, या राज्याच्या राजकारणात या जातीचा एवढा प्रभाव आहे, की या जातीला तेथे काहीवेळा ‘राजकीय जात’ असे संबोधले जाते. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे या राज्याचे 2000 पासून मुख्यमंत्री असून या विधानसभा निवडणुकीत ते सलग सहाव्यांदा जनतेचा कौल मागत आहेत. त्यांच्या पक्षाला पुन्हा बहुमत मिळाल्यास ते येत्या ऑगस्टमध्ये देशाचे आतापर्यंतचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले राजकारणी बनतील. अशा प्रकारे ते सिक्किमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचा विक्रम मोडू शकतील. चामलिंग यांनी पश्चिम बंगालचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांना मागे टाकले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

बिजू पटनाईकही मुख्यमंत्री

नवीन पटनाईक यांचे पिता बिजू पटनाईक हे 1961 ते 1963 आणि नंतर 1990 ते 1995 या काळात मुख्यमंत्री होते. हे दोन्ही पटनाईक मुख्यमंत्री काँग्रेस विरोधी पक्षांचे आहेत. तर काँग्रेस नेते जनकी वल्लभ पटनाईक हे 1980 पासून 1989 पर्यंत आणि नंतर 1995 पासून 1999 पर्यंत असे 14 वर्षे मुख्यमंत्री होते. अशा प्रकारे पटनाईक आडनावाच्या नेत्यांनी 45 वर्षे सत्ता साधली आहे.

नवीन पटनाईक अविवाहित

नवीन पटनाईक हे अविवाहित आहेत. त्यांचे वय 77 वर्षांचे आहे. आपल्या कुटुंबापैकी कोणीही राजकारणात येणार नाहीत, असे त्यांनी काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले होते. तथापि, त्यांचे पुतणे अरुण पटनाईक किंवा पुतणी गायत्री या राजकारणात येऊन नवीन पटनाईक यांचा वारसा चालवू शकतात अशी चर्चा आहे. अरुण आणि गायत्री हे नवीन पटनाईक यांचे मोठे बंधू प्रेम पटनाईक यांची अपत्ये आहेत. तथापि, काही जणांच्या मते नवीन पटनाईक यांच्या विश्वासातील व्ही. के. पांडियन हे नवीन पटनाईक यांच्या जागी येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

नभकृष्ण चौधरी यांना सहा वर्षे

करन जातीचेच नभकृष्ण चौधरी यांना ओडीशाचे मुख्यमंत्रीपद सहा वर्षे मिळालेले होते. अन्य मुख्यमंत्री प्रमुखत: ब्राम्हण, रजपूत अशा सवर्ण समाजांमधील होते. निलमणी राऊतराय हेही मुख्यमंत्री होते. याशिवाय हेमानंद बिस्वाल आणि गिरिधर गोमांग या आदिवासी नेत्यांनीही काहीकाळ मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

ओडीशाची समाजरचना

करन आणि ब्राम्हण हे सवर्ण असून त्यांची लोकसंख्या साधारणत: 10 टक्के मानली जाते. त्याशिवाय अन्य मागासवर्गीय 50 टक्के आहेत. तर या राज्यात वनवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) लोक 22.8 टक्के असून दलित किंवा अनुसूचित जातींचे लोक 17 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. संख्येने केवळ 2 टक्के असूनही करन या जातीच्या हाती या राज्याचे मुख्यमंत्रीपद 51 वर्षे राहिले आहे, हे राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने विशेष आहे.

Advertisement

.