‘दाना’पासून सावधगिरीसाठी ओडिशा, पश्चिम बंगाल सज्ज
300 विमनो•ाणे, 552 रेल्वेगाड्या रद्द : लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले : किनारपट्टीवर सतर्कता
वृत्तसंस्था/भुवनेश्वर, कोलकाता
‘दाना’ या चक्रीवादळाने आता उग्र स्वरुप धारण केले असून ते येत्या चोवीस तासात केव्हाही ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सागरतटाला धडक देण्याची शक्यता आहे. ओडिशा सरकारने या वादळाला तोंड देण्यासाठी सज्जता केली आहे. 10 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून वादळात जीवित आणि वित्त हानी कमीत कमी व्हावी, यासाठी आधीपासूनच शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. ओडिशाच्या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून 552 रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कमी दृश्यमानता असल्यामुळे जवळपास 300 विमानो•ाणेही रोखण्यात आली आहेत.
बंगालच्या उपसागरात हे वादळ निर्माण झाले असून बुधवारी मध्यरात्रीपासून त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या सागरतटीय प्रदेशांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. हे वादळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर किंवा शुक्रवारी पहाटेच्या आसपास सागरतटाला थडकणार आहे. वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रतितास इतका वाढला आहे. ओडिशातील 14 जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सज्जता केली आहे. अनेक नागरिकांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी जाण्यास साहाय्य करण्यात आले आहे. अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे यांचा पुरवठा संभाव्य प्रभावित जिल्ह्यांना करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
तीन जिल्ह्यांवर संकट
या वादळाचा सर्वाधिक तडाखा तीन जिल्ह्यांना बसणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रभावित क्षेत्रांमधून लक्षावधी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हालचाली गेल्या जात आहेत. 10 लाख लोकांना हलविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. आतापर्यंत 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही सज्जता करण्यास प्रारंभ केला असून कोलकाता विमानतळ व्यवस्थापनाने पुढच्या 15 तासांसाठी विमान उ•ाणे रद्द केली आहेत. केंद्र सरकारनेही या दोन्ही राज्यांना आवश्यक ते सर्व आपदानिवारण साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.