‘दाना’ला तोंड देण्यासाठी ओडिशा सज्ज
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
‘दाना’ या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ओडिशा सरकार सज्ज होत आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये हे वादळ ओडिशाच्या सागरतटाला धडक देण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात हे वादळ निर्माण झाले असून त्याचा वेग आणि तीव्रता वाढत आहे. त्याच्या हालचालींच्या दिशेचा मागोवा उपग्रहांच्या माध्यमातून घेण्यात येत असून ते लवकरच ओडिशाला थडकणार आहे.
ओडिशा सरकारने दक्षतेचा उपाय म्हणून 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या काळात 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळांना सुटी घोषित केली आहे. तसेच, आपत्तीनिवारण पथकांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळ प्रभावित क्षेत्रांमधील लोकांना सुरक्षित स्थानी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या असून तशी व्यवस्थाही राज्य सरकारने केली आहे. वादळाचा तडाखा तीव्र असल्यास प्रभावित लोकांसाठी साहाय्यता शिबिरे स्थापित करण्यासाठी जुळवाजुळव करण्यात आली आहे. वादळ प्रभावित लोकांना अन्न, औषधे आणि निवारा यांचा तुटवडा पडू नये, म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. या वादळाचा तडाखा किमान चार जिल्ह्यांना बसेल अशी शक्यता गृहित धरुन पूर्वतयारी करण्यात येत आहे.
प्रशासनांना आदेश
वादळाने प्रभावित होऊ शकणाऱ्या जिल्ह्यांच्या प्रशासनांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आपत्कालीन साहाय्यता विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रसंगाशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून साधनसामग्रीचे संकलन करण्यात येत आहे. या वादळाची सूचना तीन दिवसांपूर्वीच देण्यात आल्याने पूर्वसज्जता ठेवण्यासाठी प्रशासनाला कालावधी मिळाला आहे. केंद्र सरकारनेही ओडिशा सरकारला साहाय्य करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून केंद्रीय आपत्तीनिवारण यंत्रणा कामाला लागली आहे.
कोणते चौदा जिल्हे...
गंजाम, पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक, बालासौर, मयूरभंज, केओंझार, ढेंकानाल, जाजपूर, अंगुल, खुर्दा, नयागढ आणि कटक या चौदा जिल्ह्यांना या वादळाचा प्रभाव जाणवणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या चौदा जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.