ई-केवायसी पूर्ण न केल्यास ऑक्टोबरचे वेतन रोखणार; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ
कोल्हापूर: शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेला आता ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या अंतिम मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचायांचे ऑक्टोबर महिन्याचे (नोव्हेंबरमध्ये देय असलेले) वेतन काढले जाणार नाही, असा सक्त इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
वित्त विभागाच्या व शासनाच्या सूचनेनुसार शालार्थ आणि सेवार्थ प्रणालीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी शिक्षण संचालनालयाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, क्षेत्रीय स्तरावर या कामाचा आढावा घेतला असता, अनेक कर्मचाऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी असल्याचे आणि तांत्रिक व इतर कारणांमुळे या प्रक्रियेला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत ही मुदत ५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, ५ ऑक्टोबर ही ई-केवायसीसाठी अंतिम मुदत असेल. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. दिलेल्या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर चे वेतन (देय नोव्हेंबर २०२६) आहरित केले जाणार नाही. या कारवाईची सर्व संबंधितांनी अत्यंत गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आपल्या स्तरावरून सर्व शाळांना याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात, असे आदेश शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
या कर्मचाऱ्यांसाठी आहे अनिवार्य
खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, पूर्ण अनुदानित तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे.