For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘ऑक्टोबर हिट’ जागतिक तापमान वाढीचे दृष्यपरिणाम !

06:11 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ऑक्टोबर हिट’ जागतिक तापमान वाढीचे दृष्यपरिणाम
Advertisement

ऑक्टोबर महिना सुरू असल्याने शरद ऋतुतील थंडीची मंद चाहूल लागायला हवी होती पण सध्या एप्रिल-मेसारख्या उष्णतेच्या वाढत्या पाऱ्याने जीव कासावीस करून  सोडला आहे. हवामान बदलाच्या संकटाचे गहिरे संकेत देणारे हे दृष्य परिणाम आहेत. हे सांगण्यासाठी कुणाही भविष्यव्येत्त्याची, हवामानतज्ञाची किंवा निसर्गशास्त्रज्ञाची आवश्यकता नसून प्रकृतीत दिसणारे व मानवी शरीराला जाणवणारे बदलच पुरेसे आहेत. गेल्या काही वर्षांपासून समुद्रात सातत्याने घोंगावणारी वादळे, अवेळी होणारी अतिवृष्टी, गायब झालेली थंडीची हुडहुडी आणि उच्चांक गाठणारा उष्णतेचा पारा जागतिक तापमानवाढीचे दृष्य परिणाम सांगतात.

Advertisement

गोव्यासह कोकणपट्टीमध्ये गेल्या आठवड्याभरात ‘ऑक्टोबर हिट’मुळे उष्णतेचा पारा चढलेला आहे. गोव्यात कमाल तापमान 37.2 अंश सेल्सियस नोंद झाले असून आत्तापर्यंतचा हा उच्चांक मानला जातो. ही स्थिती केवळ गोव्यातच नसून, देशभरातील विविध राज्यांमध्ये यंदा कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आपत्ती ओढवली आहे. गोवा आणि कोकण प्रांत समुद्री तटावर असल्याने तापमान बदलाचे संकेत सर्वांत आधी या प्रांतात जाणवू लागतात. यंदा मान्सूनने मृग नक्षत्राला हुलकावणी दिल्याने जूनच्या उत्तरार्धात पावसाला सुऊवात झाली. जुलै सुरू होईपर्यंत केवळ 165 मि.मी. पर्यंत झालेल्या पावसाची नोंद व या हंगामात 32 टक्के पावसाची तूट, हे संभाव्य जलसंकट आणि असह्या उष्णतेच्या तापमानाचे संकेत देतात.

यावर्षी पाऊसमान घटण्यामागे समुद्रातील ‘एल नीनो’चा प्रभाव हे एक कारण असले तरी त्यामागील विविध कारणामीमांसा थेट पर्यावरणीय ऱ्हासाच्या मुळाशी निर्देश करतात. ‘एल नीनो’चा हा प्रभाव फेब्रवारी 2027 पर्यंत राहणार असल्याचे काही हवामान तज्ञ्जांचे निरीक्षण आहे. तसे झाल्यास पुढील वर्षभर या संकाटाच्या मालिकांना विविध स्तरावर तोंड द्यावे लागेल. त्याची पूर्वतयारी म्हणून जलस्रोत आणि पाणी पुरवठा विभागाने जनतेला काळजीपूर्वक पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. परतीच्या पावसाची शक्यता नसल्याने राज्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जलस्रोत खात्याने महिनाभर आधीच 250 बंधाऱ्यांची दारे बंद करून पाणी अडविले आहे. किमान एक महिना पुरेल एवढा अतिरिक्त पाणीसाठा राखण्याचे हे नियोजन आहे.

Advertisement

भरपूर पाऊस पडणाऱ्या गोव्यावर प्रथमच ही वेळ आल्याने एप्रिल-मेपर्यंत पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी आत्तापासूनच जलस्रोत खात्याला ही तरतूद करावी लागत आहे. शेती-बागायतीबरोबरच जनतेला दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी काळजीपूर्वक वापरावे लागेल. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने येथील लोकसंख्येबरोबरच देश-विदेशातून येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी अतिरिक्त पाण्याची वेगळी व्यवस्था हवी. या सर्व गोष्टींचे अचूक नियोजन केवळ एका बाजूने होणे शक्य नाही. त्यासाठी घरगुती वापरापासून हॉटेल्स व अन्य व्यावसायिकांना परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने पाणी वापरावे लागेल.

गोव्याला भरभरून मिळालेली पर्यावरणसमृद्धी राखण्यापेक्षा ती ओरबाडण्याची वृत्ती गेल्या वर्षभरापासून एका मोठ्या संकटात ढकलत आहे. जल, जंगल आणि जमिनी राखण्याच्या याच मुद्यावर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांपैकी काही जाणकारांनी गोव्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विद्ध्वंसाकडे सरकारचे लक्ष वेधत व्यापक जागृती सुरू केली आहे. सुपिक जमिनी व डोंगराचे भूखंडात झपाट्याने होणारे रुपांतर हा कळीचा मुद्दा असला, तरी त्यापलीकडे महाकाय कॅसिनो जहाजांमुळे होणाऱ्या समुद्री प्रदुषणाला अटकाव करण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्याकडे विरोधकांचे आंदोलन म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकता येणार नाही. निसर्गात झपाट्याने होणारे हे बदल माणूस सोडून अन्य घटकांना जाणवत आहेत. त्यामुळेच ओंकार हत्तीसह गवे, बिबटे व अन्य वन्यप्राणी मानवीवस्तीमध्ये फिरकताना दिसतात. बेसुमार रेती उत्खनन आणि जल प्रदुषणामुळे जलचरांच्या अन्नसाखळीमध्ये झालेले विपरित बदल मगरी व इतर प्राण्यांना आपले अधिवास सोडण्यास कारणीभूत ठरले आहेत.

मानवी प्रगतीसाठी विकास अनिवार्य आहे पण तो अमर्याद झाल्यास त्याचे उलट परिणाम काय होऊ शकतात, याची नांदी गोव्यातील विविध भागात पाहायला मिळते. या छोट्या राज्यातील एकंदरीत लोकसंख्येच्या तुलनेत निवाऱ्याची अनावश्यक गरज दिवसागणिक वाढतच आहे. निवाऱ्याच्या गरजेपेक्षा गुंतवणूक आणि व्यावहारिक गणितांमुळे जमिनींचे झपाट्याने भूखंडात रुपांतर होऊ घातले आहे. पर्यटकांसाठी गोवा आता केवळ प्रेक्षणीय स्थळ उरलेला नाही. देशभरातील पर्यटकांना स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी या छोट्या राज्यात एक जमिनीचा तुकडा हवा आहे आणि संभाव्य संकटांमागील तेच मुख्य कारण आहे. निसर्ग हा संवेदनशील असून बोथट झालेल्या मानवी संवेदनांना त्याचे हुंकार ऐकू येत नाहीत. हल्लीच नेपाळमध्ये आलेला महाप्रलय, केरळमधील महापूर आणि उत्तराखंडातील जलप्रपात या सर्व आपत्ती निसर्गाच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचा परिणाम सांगतात.

जंगले नष्ट झाल्यास जमिनीची पाणी शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता संपते. पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याची क्षमताच नष्ट होते, हे जर्मन शास्त्रज्ञ अॅलेक्झेंडर वॉर्न हम्बोल्ट यांनी दोन शतकापूर्वी जगाला सांगितले होते. त्यांनी आजवर नोंदविलेली जगभरातील पर्यावरणाची भाकिते आपण दृष्यऊपात पाहत आहोत...!

सदानंद सतरकर

Advertisement
Tags :

.