आरक्षण चर्चेसाठी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त
पंचमसाली वकिलांच्या मेळाव्यात कुडलसंगम स्वामीजींना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
बेळगाव : पंचमसाली समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी येथील महात्मा गांधी भवन येथे पंचमसाली वकिलांचा मेळावा झाला. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वामीजींना 15 ऑक्टोबरची वेळ दिली आहे. कुडलसंगम येथील जगद्गुरु बसव जयमृत्यूंजय स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पंचमसाली वकिलांच्या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री सी. सी. पाटील, माजी मंत्री विनय कुलकर्णी, माजी मंत्री ए. बी. पाटील, ॲड. एम. बी. जिरली, ॲड. आर. पी. पाटील, ॲड. राजू बागेवाडी, गुंडू पाटील आदींसह समाजाचे कायदेतज्ञ उपस्थित होते. या मेळाव्यात आरक्षणासंबंधी चर्चा झाली. आजवरच्या लढ्याचा आढावा घेण्यात आला. तोपर्यंत विनय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संपर्क साधून स्वामीजींच्या हाती फोन दिला. यावेळी मुख्यमंत्री आणि स्वामीजी यांच्यात चर्चा झाली. पुढील चर्चेसाठी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
...तर सुवर्ण विधानसौधला घेराव
या वर्षाअखेरीस सुवर्णविधानसौध येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा कार्यक्रम हाती घेण्यावर चर्चा झाली. बसनगौडा पाटील-यत्नाळ हे मिरवणुकीतून येणार होते. मात्र मिरवणुकीत भाग घेण्यास जिल्हा प्रशासनाने आदेशाद्वारे मज्जाव केला.