महासागर आपले कवच, पण त्यालाही मर्यादा आहेत!
महासागर आपले कवच, पण त्यालाही मर्यादा आहेत! ‘सागर महोत्सव’ भविष्यासाठी दिलेली नैतिक साद : समारोप प्र्रसंगी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : महासागर टिकतील. कारण ते आपल्यापेक्षा जुने आणि अधिक विशाल आहेत. खरा प्रश्न इतकाच आहे की, महासागरांनी आजवर जसे आपल्याला वाचवले तसे आपण स्वत:ला शहाणपणाने वाचवू शकतो का. खोल समुद्र हवामान नियंत्रित करतो. अतिरिक्त उष्णता सातत्याने आणि शांतपणे शोषून घेतो. महासागर हे आजवर आपले कवच राहिले आहेत. परंतु त्या कवचालाही मर्यादा आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले. आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आज्ण एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सागर महोत्सव’ समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘सागर महोत्सव‘चा हा समारोप समारोप म्हणून नव्हे, तर भविष्यासाठी दिलेली नैतिक साद म्हणून इतिहासात नोंदला जाईल, असे ते म्हणाले.
‘मन की बात’मधून कौतुक होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मधून देशवासियांना संबोधित करत असतात. या कार्यक्रमात त्यांनी अनेकदा देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा उल्लेख केला आहे. ‘सागर महोत्सवा’ची सकारात्मक परिणामकारकता पाहता भविष्यात या कार्यक्रमाचेही कौतुक ‘मन की बात’मधून होऊ शकते, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले.
सहा सागरी किल्ल्यांचा अहवाल प्रकाशित
अर्नाळा, खांदेरी, कुलाबा, जंजिरा, पद्मदुर्ग आणि उंदेरी या सहा सागरी किल्ल्यातील जैवविविधतेशी संबंधित दीडशे पानी अभ्यास अहवालाचे प्रकाशन डॉ. संजय देशमुख, डॉ. शेखर मांडे, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनतर्फे अभ्यास करण्याची जबाबदारी पर्यावरण तज्ञ हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अशा दोन हंगामामध्ये हा अभ्यास करण्यात आला. महोत्सव यशस्वाr करण्यासाठी आसमंचे नंदकुमार पटवर्धन, नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे, जगदीश खेर यांनी मेहनत घेतली. महोत्सवासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आसमंतच्या वतीने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन दूहिता सोमण-खेर यांनी केले.