स्मशानभूमीत अघोरी कृत्य ! रक्षाविसर्जनापूर्वीच मुला-मुलींच्या नावाचे नारळ वाढवून भानामतीचा प्रकार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वाकरे: बालिंगा (ता. करवीर) येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी भानामतीचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर रक्षाविसर्जन करण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तींकडून स्मशानभूमीत नारळ वाढवण्यात आले. या नारळांवर स्थानिक तरुण-तरुणींची नावे लाल रंगाने लिहून तिथेच तांत्रिक पुजाअर्चा करण्यात आली आहे. या अघोरी कृत्यामुळे ग्रामस्थ प्रचंड धास्तावले असून गावात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिंगा स्मशानभूमीत गेल्या काही दिवसांपासून मानामतीचा अघोरी प्रकार सुरू आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केले जाते. या दरम्यान, अंधारात काही अज्ञात लोक स्मशानभूमीत जाऊन नारळ फोडतात आणि फोडलेले नारळ स्मशानभूमीच्या आवारात टाकतात या नारळांवर मुला-मुलींची नावे लिहिलेली असून तेथे कुंकू, गुलाल आणि इतर तांत्रिक साहित्य आढळले आहे. दरम्यान, हा प्रकार जादूटोणा, भानामती असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुला-मुलीच्या जीवाला थोका निर्माण होण्याच्या भीतीपोटी पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे. या प्रकारामुळे बालिंगा परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या आसपास जाण्यासही ग्रामस्थ घाबरत आहेत. विकृत लोकांचा आणि मांत्रिकांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा !
ग्रामपंचायत सदस्य धनंजय डेंगे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवून अशा अघोरी कृत्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अशा अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजाला घाबरवण्याचे काम काही समाजकंटकांकडून सुरू आहे. विज्ञान युगात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम सुरू असून याला आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.