कामात अडथळे... तरी योजना प्रगतीपथावर
रत्नागिरी :
रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील ३४ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणाऱ्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेची अंदाजित सुधारित किंमत १३५.१५ कोटी रुपये आहे. पण या योजनेच्या ठेकेदाराचे ११ कोटी रुपयांचे देयके प्रलंबित असणे, अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी जागा उपलब्ध नसणे आणि हातखंबा ते मियापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करत योजनेचे काम सुमारे ५६ टक्के पूर्ण झाले आहे.
या पाणीपुरवठा योजनेमुळे सुमारे १ लाख ८६ हजार २०५ व्यक्तींना म्हणजेच २०२२ च्या लोकसंख्येनुसार प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला काही प्रमाणात कामाचा वेग मंदावला असला तरी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून मार्ग काढण्यात येत असल्याचे जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता योगेश नानजप्पा यांनी सांगितले. या योजनेच्या प्रगतीचा आलेख पाहता योजनेंतर्गत अनेक महत्वाच्या कामांची प्रगती लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले, त्यात वळके येथे जॅकवेल व पंपगृह तळघराचे काम पूर्ण झाले आहे, ज्यामुळे पाण्याची उचल क्षमता वाढली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली असून मुख्य अभियंत्यांच्या मान्यतेने प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पानवल झोनमध्ये जुगाईनगर, आपकरेवाडी व होरंबेवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. शहरानजीकच्या खेडशी झोनमध्ये खेडशी-चांदसूर्या, डफळचोळवाडी, खेडशी-भंडारवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम सुरू आहे. तर खेडशी-महालक्ष्मी मंदिर, खेडशी-द्वारकानगर (पोमेंडी बु.) आणि खेडशी-आदिशक्तीनगर (पोमेडी बु.) येथील छताचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच गावडेवाडी सिंटेक्स टाकी, रवींद्रनगर, मिरजोळे-नवीन वसाहत व उत्कर्षनगर कुवारबाव येथील कामेही पूर्ण झाली आहेत. नाचणे येथे मुख्य संतुलन साठवण टाकीच्या तिसऱ्या टप्याचे बांधकाम सुरू आहे. करबुडे झोनमध्ये मूळगाव व धनावडेवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. निवळी झोनमध्ये मालपवाडी येथील मुख्य संतुलन टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. मिरजोळे, घवाळीवाडी-मिरजोळे व नाचणे येथेही उंच साठवण टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले. जुवे येथे जमिनीच्या उपलब्धतेबाबत अडचण असली तरी यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. शिरगाव, उद्यमनगर व साईभूमीनगर-मिरजोळे येथील छताचे काम पूर्ण झाले आहे. जाकीमिऱ्या, सडामिऱ्या व आनंदनगर येथील छताचे काम पूर्ण झाले आहे. नवीन कामांपैकी निवळी-तेलीवाडी व कोकजेवाडीत सिंटेक्स टाक्यांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. पाईपलाईन व गुरुत्ववाहिनी टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. एकूण ११८.१० कि.मी. गुरुत्व वाहिनीपैकी ७५.०० कि.मी. गुरुत्व वाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
- हातखंबा ते मिऱ्यापर्यंत महामार्गाच्या बाजूने पाईपलाईन टाकण्याचा प्रश्न
योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या काही ठिकाणी विशेषतः अॅप्रोच रोडवरील ग्रामपंचायतींकडून जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत आहेत. तसेच ठेकेदाराचे देयके प्रलंबित असल्याने कामाचा वेग काहीसा मंदावला होता. यावर उपाययोजना म्हणून प्रशासकीय स्तरावर चर्चा करून मार्ग काढण्यात येत आहे. हातखंबा ते मिऱ्यापर्यंत महामार्गाच्या बाजूने भूसंपादन न केल्यामुळे पाईपलाईन टाकण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरही प्रशासकीय स्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.