हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा
कन्नड सक्तीविरोधात 9 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : मराठीबहुल असलेल्या सीमाभागामध्ये कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती लागू केली. यामुळे मराठी भाषिकांतून त्याला तीव्र विरोध झाला. कन्नड सक्तीविरोधात लढा देताना अनेकांनी हौतात्म्य पत्करले. दि. 17 जानेवारी रोजी त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे. तर सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात दि. 9 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मराठा मंदिर येथे म. ए. समिती सदस्यांची बैठक झाली. सालाबादप्रमाणे कंग्राळी खुर्द, हुतात्मा चौक, निपाणी, खानापूर येथे हुतात्मा दिन पाळण्यात यावा, यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कर्नाटक सरकारकडून कन्नड फलकांसाठी सुरू असलेल्या सक्तीविरोधातही आवाज उठविण्यात आला. कर्नाटक सरकारकडून असेच धोरण अवलंबल्यास मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. कन्नड फलकांसाठी दुराग्रही संघटनांकडून धमकाविण्यात येत आहे. व्यापाऱ्यांवर दबाव घातला जात आहे. याविरोधात लढा देण्याची गरज आहे. यासाठी दि. 9 जानेवारी रोजी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात भव्य मोर्चा काढून प्रशासनाला मराठी भाषिकांची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सुरू असलेली दडपशाही थांबविण्यात यावी, यासाठी निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी समिती नेते प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, अॅड. राजाभाऊ पाटील, अॅड. एम. जी. पाटील, गोपाळ पाटील, बाबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई, विलास बेळगावकर, बी. डी. मोहनगेकर, गोपाळ देसाई, राजू पाटील, रणजीत चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.