For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौकसखोर...

06:05 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौकसखोर
Advertisement

लहान मुलांचे प्रश्न सुरू झाले की बरेचदा ‘शुभ बोल नाऱ्या’ अशी म्हण वापरावीशी वाटते कारण ती केव्हा काय प्रश्न विचारतील याचा नेम नसतो. विमानात बसले की विमान पडलं तर असा प्रश्न विचारून सगळ्यांच्या पोटात गोळा आणतात. सिनेमाला गेले की कधीही सिनेमा समोरच्या पडद्यावर न बघता मागून येणाऱ्या उजेडाकडे बघण्याचा त्यांचा नित्यक्रम असतोच पण आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भयंकर प्रश्न विचारून त्रासात टाकणारी लहान मुलं जागोजागी पाहायला मिळतात. प्रश्न विचारणं, शंखेकोरपणा, चौकसपणा या सगळ्या बालसुप्त गोष्टी अनेक मोठ्या माणसांमध्येदेखील दिसून येतात. अशीच माणसं किंवा मुलं मोठेपणी काहीतरी वेगळं करून दाखवतात, असंही मानलं जातं. शास्त्रज्ञांच्या बाबतीत ही गोष्ट नेहमी खरी ठरली. ते शाळेतल्या पाठ्यापुस्तकातल्या विषयात कधीच रमले नाहीत तर प्रत्यक्ष अनुभूतीने त्यांनी अनेक गोष्टी सिद्ध करण्याचाच प्रयत्न केला. अशा प्रश्न विचारणाऱ्या शास्त्रज्ञांना शाळेतून हाकलून देण्याचीच वेळ त्यांच्यावर आली होती पण घरामध्ये मात्र आपण मुलांच्या बाबतीत असं करू शकत नाही आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. त्यांच्या वयाच्या होण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही किंवा त्यांच्या मनाचे समाधान होईल अशी उत्तरं आम्हाला देता येत नाहीत. त्याकाळी शिक्षकांना प्रश्न विचारणं म्हणजे महाभयंकर गोष्ट. कारण असे प्रश्न वगैरे विचारले तर मार्कोटे शिक्षक आणि संतापी वडील दोघेही सारख्याच पद्धतीने प्रतिक्रिया द्यायचे. म्हणजे मारायचे आणि वेळच आली तर वडील शाळेतून सांगूनच टाकायचे की ह्याला काही वाटलं तरी बदडून काढा. म्हणजे कुठे काही बोलायची सोयच राहायची नाही. आम्हा मुलांना लहानपणी अनेक प्रश्न पडत. पीठ कुठून येतं, दूध कोण देतं, वाघ गवत का खात नाही, सूर्य उगवतो म्हणजे तो कुठे झोपतो, पाऊस कुठून येतो वगैरे वगैरे. खरं म्हणजे या पावसाचे मी अनेक प्रयोग करून पाहिले. हातामध्ये भांड घेऊन अंगणात जायचं आणि उंच पाणी उडवायचं. अशावेळी ह्या आकाशापर्यंत पाऊस कसा काय पोहोचतो किंवा पाणी कोण नेऊन ठेवतं, हा प्रश्न पडायचाच. असा प्रश्न कुणाला विचारलाच की त्यांना उत्तर येत नसल्यामुळे बोलणी खायचाच प्रसंग यायचा. घरी आलेले पाहुणे आपण खूप विद्वान आहोत असं समजून मुलांना पाढे तरी विचारायचे, नाहीतर एखादं स्पेलिंग. असेच एक पाहुणे एका घरी आले आणि त्यांनी मुलाला विचारलं तो बघ सूर्य मावळतोय. आता तो कुठे जाणार सांग बरं. मुलगा काहीच बोलला नाही. सूर्य डोंगरापलीकडे जातो, एवढेच त्याला माहित. त्याहीपेक्षा त्याला माहिती असलेली गोष्ट पाहुण्यांना माहिती नव्हती. त्याने पाहुण्यांनाच प्रतिप्रश्न केला. देवाजवळ दिवा लावलाय तो मी हवेने फुंकर मारून विझवतो. तो कुठे गेला सांगा बरं. पाहुण्यांनी आपलं थातूरमातूर उत्तर दिलं आणि दिवा विझलाय असं सांगितलं. मग मुलांनी हाताची घडी घालून उत्तर दिलं दिवा विझतो याचाच अर्थ त्याचं दुसऱ्या ऊर्जेत रुपांतर होतं. त्याला त्याच्या आजीने शिकवलं होतं. मग पाहुणे मात्र अगदी कावरेबावरे झाले होते.

Advertisement

असे प्रश्न विचारणारी आणखीन एक मुलगी आम्हाला एका कथेतून भेटली. तिचं नाव तोत्तो चान, तिला असेच प्रश्न पडायचे, शाळेत का जायचं?, सगळे प्राणी घरी आणले तर? फुलपाखरांची फुलं झाली तर? तिच्या अशा भयंकर प्रश्नांना उत्तर द्यायलाच नको, म्हणून तिला शाळेतून काढून टाकले जायचे. शेवटी या मुलीला तिच्या आवडीची तिला पचेल, रुचेल अशी सुंदर शाळा शेवटी मिळतेच आणि तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू तिला मिळायला लागतात. कारण असे प्रश्न विचारणारी मुलं धडा वाचून किंवा बघून करणाऱ्यातली नसतात, तर प्रत्येक गोष्ट करून बघणाऱ्यातली असतात. त्यांना करून पाहिल्याशिवाय चैन पडत नसते. म्हणूनच अशा मुलांना उत्तर देण्याचा किंवा त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायला हवा. अशी मुलंच देशाचं उत्तम भविष्य घडवणारी असतात. नुसते प्रश्न विचारणारे, समस्या निर्माण करणारे काय वाटेल तेवढे प्रश्न मिनिटाला उभे करतात. पण उपाय मात्र सांगत नाहीत किंवा कुठल्या उपक्रमात भाग न घेता आडकाठी मात्र आणतात. पण उत्तर देणारे, उपाय शोधणारे मात्र फार कमी असतात. म्हणून नुसते प्रश्न विचारणाऱ्या मुलांपेक्षा उत्तर शोधून काढणारी मुलं किंवा काही पर्याय देणारी मुलं बनवण्याचा प्रयत्न करूया.

Advertisement
Advertisement
Tags :

.