कॅम्पमधील रस्त्यांच्या नावांवरून कन्नड संघटनेची कोल्हेकुई
कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी सडेतोड उत्तर दिल्याने संघटनेच्या म्होरक्यासह कार्यकर्ते माघारी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने कॅम्प येथील रस्त्यांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने कन्नड संघटनांनी कोल्हेकुई सुरू केली आहे. सोमवारी काही कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांची भेट घेऊन सध्या समाविष्ट करण्यात आलेल्या नावांना विरोध दर्शविला. तसेच इतर राज्यातील अधिकाऱ्यांची नावे देऊ नयेत, अशी मागणी केली. परंतु, कॅन्टोन्मेंटच्या सीईओंनी आंदोलकांना सडेतोड उत्तर दिल्याने संघटनेच्या म्होरक्यासह कार्यकर्त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले.
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये इंग्रजांच्या काळापासून जुल्मी इंग्रज अधिकाऱ्यांची नावे रस्त्यांना देण्यात आली होती. या नावांचा आपल्या देशाला कोणताच उपयोग नसल्याने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये असल्याने कॅम्प येथील हाय स्ट्रीट रोडला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. याचबरोबर एकूण 38 रस्त्यांची नावे बदलण्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत मंजुरी देण्यात आली असून हरकती मागविण्यात आल्या आहेत.
देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांची नावे नव्या रस्त्यांना देण्यात आली आहेत. देशभरातील जवानांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. परंतु, नेहमीच भाषिक मुद्द्याने पछाडलेल्या कन्नड संघटनेला हे रुचलेले नाही. त्यांनी कॅन्टोन्मेंट कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर राज्यातील सैनिकांपेक्षा कर्नाटकातील सैनिकांची नावे देण्याची मागणी केली. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांनी निवेदन स्वीकारत देण्यात आलेल्या नावांना कॅन्टोन्मेंट बोर्ड मिटींगमध्ये मंजुरी मिळाल्याचे सांगितले. तसेच अन्य नावे समाविष्ट करावयाची असतील तर प्रस्ताव द्यावा, असे सांगितले. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांची नावे देण्यात आल्याने याबाबत कोणताच वाद नसल्याचे स्पष्ट केले.