ओबीसी संघर्ष समितीचा गुहागरमध्ये मोर्चा
गुहागर :
सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समितीने शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते गुहागर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढत या आरक्षणाला कडाडून विरोध केला. यावेळी 24 मागण्यांचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे, तो ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे. याबद्दल राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर अध्यक्ष पांडुरंग पाते, सरचिटणीस नीलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, प्रदीप बेंडल, नेत्रा ठाकूर, अनिल निवाते, गौरव वेल्हाळ, संगम मोरे यांच्यासह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.