‘मराठा’च्या अग्निवीरांचा शपथविधी सोहळा
651 अग्निवीर देशसेवेत रुजू : कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांची उपस्थिती
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे मंगळवारी अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या चौथ्या बॅचचा शपथविधी सोहळा पार पडला. एकूण 651 अग्निवीरांचे 31 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते देशसेवेमध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सर्व अग्निवीरांचे खडतर प्रशिक्षण घेऊन देशसेवेत रुजू झाल्याबद्दल कौतुक केले. मराठा लाईट इन्फंट्री ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे.
सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीवर त्यांनी भर दिला. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा त्यांच्या कार्यकाळात नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास ब्रिगेडियर मुखर्जी यांनी व्यक्त केला. पथसंचलनाचे प्रतिनिधीत्व अग्निवीर कमांडंट अतुल लहाने व मेजर संदीपकुमार यांनी केले. अग्निवीरांना राष्ट्रध्वजाच्या साक्षीने प्रतिज्ञा देण्यात आली. नाईक यशवंत घाटगे यांना व्हिक्टोरिया क्रॉस मेडल तर सर्वोत्तम अग्निवीर म्हणून साहिल शिंदे यांना गौरविण्यात आले. शरकत युद्धस्मारक येथे अग्निवीरांनी अभिवादन केले व या सोहळ्याचा शानदार समारोप झाला. यावेळी मराठा रेजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी, मान्यवर व अग्निवीरांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.