For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे राजा, तू सत्त्वगुणी हो

06:10 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
हे राजा  तू सत्त्वगुणी हो
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

सत्वगुणामुळे ज्ञान व शांती मिळते पण बेसावध असलेला सत्वगुणी मनुष्य अहंकारी होऊ शकतो. रजोगुणी मनुष्य कायम अतृप्त असतो तर तमोगुणी मनुष्य झोप, आळस आणि व्यसनात आयुष्य घालवतो. पुढील श्लोकात बाप्पा राजाला सत्वगुणी होण्यास सांगत आहेत

एषु त्रिषु प्रवृद्धेषु मुक्तिसंसृतिदुर्गतीऽ ।

Advertisement

प्रयान्ति मानवा राजंस्तस्मात्सत्त्वयुतो

भव ।। 34 ।।

अर्थ-हे तीन गुण वृद्धि पावले असता मनुष्य अनुक्रमे मुक्ति, संसार आणि दुर्गति प्राप्त करून घेतो. म्हणून राजा तू सत्त्वगुणयुक्त हो.

विवरण-प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या घटना घडणार हे जरी पूर्वनियोजित असलं तरी त्या प्रत्येक प्रसंगात मन आणि बुद्धीचा वापर करून कसं वागायचं हे ठरवायचा अधिकार ईश्वराने माणसाला दिलेला आहे. म्हणून एकाच प्रसंगात निरनिराळ्या गुणांचा प्रभाव असलेली माणसं निरनिराळ्या पद्धतीने वागताना दिसतात. हे लक्षात घेऊन बाप्पा म्हणतात की, माणसाने सत्वयुक्त व्हावं कारण तो संयमी, लोककल्याणकारी कार्ये करणारा असतो, त्याला मरणोत्तर चांगली गती मिळते. रजोगुणी मनुष्यही कर्मे करत असतो पण ती स्वार्थ साधणारी असल्याने त्याचा लोभ वाढवत असतात. अशा लोकांना पुनर्जन्म मिळतो तर तमोगुणी व्यक्ती पापचरण करणाऱ्या असल्याने मृत्यूनंतर अधोगतीला जातात.

केवळ मनुष्य जन्मातच आपलं व्यक्तिमत्व घडवायची संधी ईश्वर देत असतो. इथं भविष्य हा शब्द न वापरता व्यक्तिमत्व हा शब्द वापरलाय कारण माणसाच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार असतात त्या सर्व पूर्वकर्मानुसार घडत असतात आणि त्यावर माणसाचे नियंत्रण नसते. त्या सुखाच्या व अनुकूल अशा असतील तर नियती वगैरे गोष्टी माणसाच्या लक्षातही येत नाहीत पण जेव्हा प्रतिकूल गोष्टी घडू लागतात तेव्हा मनुष्य हतबल होतो. अशा वेळी ईश्वर किंवा त्याचं सगुण रूप असलेले सद्गुरु त्याचं दु:ख, वेदना सुसह्य करतात. या सर्व सुखदु:खाच्या प्रसंगातून जात असताना मनुष्य वागतो कसा ह्याला फार महत्त्व आहे आणि त्यादृष्टीने स्वत:च्या व्यक्तिमत्वात अनुकूल बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे ईश्वराने माणसाच्या हातात ठेवले आहे. थोडक्यात परिस्थिती कशीही येवो मी माझ्या ठरवलेल्या तत्वानुसार वर्तणूक करीन असे माणूस ठरवू शकतो. ही तत्वे कोणती असावीत यावर माणसाचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. त्यादृष्टीने बाप्पा उपदेश करतायत की, तू सत्वयुक्त हो आणि त्यानुसार वाग. सत्वयुक्त होण्याचं महत्त्व सांगायचं म्हंटलं तर, सात्विक गुण वाढले की, माणसाची सर्व इंद्रिये ज्ञानमय होतात आणि त्या इंद्रियांकडून सात्विक क्रिया सहजी घडू लागतात. म्हणजे अमुक प्रसंगात अमुक वागलं तर ते योग्य होईल असा विचार करत न बसता मनुष्याची वागणूक, कोणत्याही प्रसंगाला योग्य अशीच घडत जाते. उदाहरणार्थ एखाद्याने दुसऱ्याच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा निश्चय करणे हा निश्चितच सत्वगुण आहे. सवयीने तो त्याच्या अंगात इतका भिनतो की एखादा अडचणीत आहे असं दिसलं की, तो काही सांगायच्या आधीच हा त्याच्या मदतीला धावून जातो. पुढं पुढं तर असं घडतं की, अमुक ठिकाणी अमुक माणसाला अडचण येईल हे हेरून हा त्याला मदत करायला आधीच तेथे हजर असतो. आपल्या पाहण्यात असे लोक असले तर निश्चित समजावे की, सत्वगुण त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. सत्यवचनी असणे हे सत्वगुणी माणसाच्या स्वभावात मुरलेले असते. त्यामुळे तो सांगतोय ना, मग ते खरंच असणार असं माणसं छातीठोकपणे सांगतात. समाज अशा माणसाचा आदर करतो. त्यामुळे चारचौघात सत्वगुणी स्वभावाचा माणूस उठून दिसतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.