For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवा, कर्मत्याग आणि कर्म करणे ह्यापैकी चांगला मार्ग कोणता ते मला सांगा

06:30 AM Mar 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवा  कर्मत्याग आणि कर्म करणे ह्यापैकी चांगला मार्ग कोणता ते मला सांगा
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

सामान्यत: माणसाला असं वाटत असतं की, संन्यास म्हणजे कर्म करायचं टाळणे म्हणून जेव्हा एखादं कर्म करायची इच्छा नसते तेव्हा तो संन्यास घेतल्याचा आव आणतो. अर्थात त्याचे मी संन्यास घेतलाय असे म्हणणे फक्त ते कर्म टाळण्यासाठी असते. असे बोकेसंन्यासी आपल्याला नेहमीच भेटत असतात. अर्जुनाचा संन्यास घेण्याचा विचार अशाच धाटणीचा होता. प्रत्यक्षात संन्यास हा फार गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. त्यासाठी वाट्याला आलेले कर्म टाळायचे नसून केलेल्या कर्मापासून मिळालेले फळ टाळायचे असते. हे सहजी साध्य होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे कर्मयोगाचे आचरण करून आपल्या मुळच्या स्वभावात बदल घडवून आणावा लागतो. सुरवातीला कर्मयोगाचे आचरण करणारा मी निरपेक्षपणे कर्म करणार आहे असे घोकत कर्म करत असतो. पुढे असे निरपेक्षतेने कर्म करण्याची इतकी सवय होते की, स्वभावात बदल होऊन कर्म निरपेक्षतेने करावयाचे आहे हे वारंवार मनात न आणता हातून तसे कर्म आपोआप घडते. असे घडू लागले की, कर्मयोग्याला कोणत्याही कर्मातून फळाची बिलकुल अपेक्षा रहात नाही. जरी त्याला फळाची अपेक्षा नसली तरी कर्म केले की फळ हे मिळणारच हा प्रकृतीचा नियमच आहे परंतु निष्ठेने कर्मयोग आचरणाऱ्याला मिळालेले फळ नाशवंत आहे असे लक्षात आल्याने तो त्याचाही त्याग करायला सहजी तयार होतो. असा फलत्याग करायला राजीखुशीने तयार होणाऱ्याला संन्यासी असे म्हणतात. संन्यासी स्वत:च्या मनाने कोणतेही कर्म करत नाही, त्याने ते कर्म करावे अशी त्याला ईश्वरी प्रेरणा होत असते. तसे कर्म त्याने केले तरी त्याला त्यातून काहीही मिळवायचे नसल्याने त्याने कर्मत्याग केल्यासारखेच होते. अर्थातच ईश्वरी प्रेरणेने तो जे काही कर्म करतो ते अनाकलनीय असेल तरी लोकांच्या कल्याणाचेच असते.

निरपेक्षपणे कर्म करणे की आत्मज्ञान मिळवण्यासाठी कर्माचा त्याग करून संन्यास घेणे ह्यातील कोणती गोष्ट योग्य आहे ह्याविषयी अर्जुनाच्या मनात गोंधळ उडाला होता. म्हणून अध्यायाच्या सुरवातीला अर्जुनाने भगवंताना विचारले, देवा निरपेक्षतेने कर्म करायलाही सांगताय आणि आत्मज्ञान मिळव म्हणजे प्रारब्धकर्मे नष्ट होतील असेही सांगताय. ह्या दोन्हीतले माझ्यासाठी कोणते चांगले आहे ते सांगा.

Advertisement

 कृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ।। 1 ।।

 श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन भगवंतांना असे म्हणाला की, कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले आहे. मग आता कर्मयोगाला जास्त उत्तेजन का देता? श्रीअनंता तुम्ही असे हे दुटप्पी बोलू लागलात तर आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांना उलगडा होत नाही. तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे. एवढ्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की, हे तत्वज्ञान स्पष्ट करून सांगा. या दोन मार्गांपैकी चांगला मार्ग कोणता? मार्ग असा पाहिजे की, त्याचा शेवट आपले कल्याण करणारा असावा, फळ अचूक प्राप्त व्हावे आणि अनुष्ठान सहजसोपे असावे. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाने झोपेत व्यत्यय न येता सुखाने प्रवास होतो त्याप्रमाणे सुखकारक होणारा सोईचा मार्ग सांगा. ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खूष झाले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.