देवा विश्वरूप आवरा आणि मला सगुण रूप दाखवा
अध्याय आठवा
बाप्पांनी वरेण्याला सांगितले होते की, त्यांनी सर्व चराचर व्यापलेलं आहे, तरीपण वरेण्याने विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य डोळ्यांनी विश्वरूप पाहणे शक्य नसल्याने बाप्पांनी त्यांच्या लाडक्या वरेण्यराजाला ज्ञानचक्षु प्रदान केले व अतिभव्य असे विश्वरूप दाखवले. त्याची भव्यता आणि विविधता आपण श्लोक क्रमांक बारा ते बावीसमध्ये अभ्यासली. वरेण्यराजाला जरी ज्ञानचक्षु प्राप्त झालेले असले तरी त्याच्या मानवी बुद्धीच्या कुवतीनुसार त्याला ते तेज:पुंज विश्वरूप सहन झाले नाही. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे प्रत्येकाला विश्वरूप दिसणे शक्य नाही आणि दिसले तरी झेपणारे नाही, म्हणून संतांनी ईश्वराच्या सौम्य, सुंदर व हसत्याखेळत्या अशा सगुण रूपाची योजना केलेली आहे.
जे कोणी आम्ही निर्गुणाची उपासना करतो असं म्हणतात त्यांना खरोखरीच काहीही कळलेलं नसतं असं श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात. त्यांचं हे विधान लगेच पटण्यासारखंच आहे. सगुणाची आराधना करत करत मनुष्याची कुवत वाढत जाते आणि मग तो निर्गुणाप्रति पोहोचतो. विश्वरूप पाहून भ्रमित झालेल्या वरेण्य विश्वरुपाला म्हणाला, महाराज विश्वरूप दाखवा म्हणून मी हट्ट केला आणि तुम्ही, माझ्यावरील आत्यंतिक प्रेमाने तो पुरवलात. ते अपूर्व रूप पाहण्यासाठी मला ज्ञानचक्षु दिलेत पण आपलं अतर्क्य, कल्पनातीत विश्वरूप पाहून मी भयचकित झालेलो आहे. तेव्हा कृपाकरून मला आपले सौम्य सगुण रूप पुन्हा दाखवा. अर्जुनानेही भगवंतांना अशीच विनंती केली होती.
वरेण्य आणि बाप्पा यांच्यात काय आणि कसा संवाद झाला असेल त्याची कल्पना आपल्याला करता येत नाही पण भगवंत आणि अर्जुन यांच्यातल्या संवादाची कल्पना माउलींनी ज्ञानेश्वरीत सविस्तर करून दिलेली आहे. ती आपण अभ्यासू म्हणजे देव आणि भक्त यांना एकमेकाविषयी किती प्रेम वाटत असतं आणि त्या प्रेमापोटी त्यांच्यात किती जवळीक असते ते आपल्या लक्षात येईल.
माउली म्हणतात, अर्जुन भगवंतांना म्हणाला, देवा बुद्धीची जाणण्याची शक्ती आपल्या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही. त्यामुळे अंत:करणाला विश्वरूपाची कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत पूर्वी कोणीही पाहिले नसेल अथवा ऐकले नसेल असे आपले विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा, माझे मन आनंदित झाले परंतु आता अशी इच्छा आहे की, नेहमीप्रमाणे तुझ्याशी गोष्टी कराव्यात तूला मिठी मारावी पण ह्या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर मी बोलू? आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन देऊ? मला वाऱ्याबरोबर पळणे जमणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही. ह्या विश्वरूपाची भव्यता माझ्या नजरेत मावण्यासारखी नाही.
ह्याच्या भव्यतेमुळे हे श्रीकृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवा की, आपण प्रगट केलेल्या विश्वरूपाचा पसारा आता आवरता घ्या आणि मला आपले चतुर्भुजरूप दाखवा. ते पाहण्यासाठी मी आसुसलेलो आहे. मला आपल्याला भेटण्यात येणारी अडचण आपण दूर करा. माझ्या अंत:करणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, माझ्यावर प्रसन्न व्हा. मस्तकावर किरीट धारण केलेल्या, हातात गदा, चक्र असणाऱ्या तुझ्या रुपाला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ते आपले चतुर्भुज रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपले प्रचंड विश्वरूप आवरून, चतुर्भुज रूप धारण करावे.
क्रमश: