For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लडाखमधील न्योमा वायुतळ पूर्ण क्षमतेने सक्रीय

06:18 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
लडाखमधील न्योमा वायुतळ पूर्ण क्षमतेने सक्रीय
Advertisement

चीन सीमेनजीक गरजणार भारतीय लढाऊ विमाने

Advertisement

वृत्तसंस्था/ लेह

पूर्व लडाखमधील रणनीतिक महत्त्व बाळगणाऱ्या न्योमा वायुतळाला भारतीय वायुदलाने पूर्णपणे संचालित केले आहे. 13,700 फुटांच्या उंचीवरील हा जगातील सर्वात उंच लढाऊ वायुतळ आता लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि वाहतूक विमानांच्या संचालनासाठी पूर्णपणे सक्षम झाला आहे. चीन सीमेपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरील हा वायुतळ सुरू झाल्याने भारताच्या सीमा सुरक्षेत एक नवा मजबूत किल्ला तयार झाला आहे, जो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्वरित प्रतिक्रिया आणि देखरेखीला सक्षम करणार आहे.

Advertisement

हा वायूतळ पूर्वी केवळ एक धावपट्टी असलेले लँडिंग ग्राउंड होते. मागील वर्षी बीआरओने येथे ठोस धावपट्टी तयार केली होती. तर चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत सर्व आवश्यक सहाय्यक पायाभूत कार्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले होते. आता वायुदल या तळावरून विमानांचे उ•ाण, लँड करविणे आणि मर्यादित देखभाल कार्य करण्यास सक्षम आहे. न्योमा आता विमानांचे संचालन आणि त्यांच्या ‘सस्टेन्ड’ राहण्याची क्षमता बाळगून आहे. सैन्य शब्दावलीत सस्टेन्डचा अर्थ अशा तळाची क्षमता, जेथे विमानाची दुरुस्ती, इंधन भरणे, रडार संचालन, हवामानविषयक देखरेख आणि चालक दलाच्या वास्तव्याची सुविधा उपलब्ध असणे आहे.

सिंधू नदीच्या काठावर

न्योमा वायुतळ लडाखमधील सिंधू नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून 13,700 फुटांच्या उंचीवर आहे आणि हे लेहपासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे 20 अंशांपर्यंत खालावते, अशास्थितीत देखभाल सुविधांना अत्याधिक थंड हवामानात काम करण्यानुरुप तयार करण्यात आले आहे. हा तळ दीर्घकाळापासून भारतीय वायुदलाच्या रणनीतिक योजनांचा हिस्सा राहिला आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर निष्क्रीय पडलेल्या या धावपट्टीला 2009 साली पुन्हा सक्रीय करण्यात आले होते. तेव्हापासून येथून सी-130जे सुपर हर्क्यूलिस, एएन-32 वाहतूक विमान आणि हेलिकॉप्टर्सचे यशस्वी संचालन झाले आहे.

2020 मधील गलवान येथील संघर्षानंतर सरकारने 2021 मध्ये याच्या अपग्रेडेशनसाठी 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. बीआरओच्या प्रोजेक्ट हिमांकने प्रतिकूल हिमालयीन स्थितीतही हे काम पूर्ण केले. उणे 20-40 अंश तापमान, जोरदार वारे आणि काम करण्याचा मर्यादित कालावधी असतानाही 2.7 किलोमीटर लांब काँक्रिट धावपट्टीची निर्मिती ऑक्टोबर 2024 पर्यंत 95 टक्के पूर्ण झाली होती. नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व सहाय्यक सुविधा म्हणजेच हँगर, एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) भवन, क्रॅश बे, वॉच टॉवर्स आणि आवासीय व्यवस्था पूर्ण झाली. यामुळे वायुदलाने आता हा वायूतळ पूर्ण क्षमतेने सक्रीय केला आहे.

लडाखमधील चौथा वायुतळ

न्योमा हा लडाखमधील भारतीय वायुदलाचा चौथा सक्रीय तळ ठरला आहे. सध्या लेहनमध्ये एक प्रमुख वायुतळ पूर्वीपासून संचालित आहे, तर कारगिल आणि थॉइस (जो सियाचीन बेसच्या स्वरुपात ओळखला जातो)मध्ये पूर्ण विकसित धावपट्टी उपलब्ध आहे. याचबरोबर दौलत बेग ओल्डीमध्ये एक कच्ची धावपट्टी असून तेथे विशेष अभियानांसाठी वायुदलाची विमाने उतरत असतात. न्योमा आता एक पूर्ण फॉरवर्ड स्टेजिंग ग्राउंडच्या स्वरुपात काम करणार आहे. येथून राफेल आणि सुखोई-30 एमकेआय यासारख्या लढाऊ विमानांना रोटेशनल आधारावर तैनात करण्यात येणार आहे. उंचीमुळे जेट इंजिन्सना कमी तापमानात स्टार्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा वायुतळ लडाखच्या सब-सेक्टर नॉर्थमध्ये सैनिकांची तैनात, देखरेख आणि पुरवठ्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.

चुशुल धावपट्टी

संरक्षण मंत्रालय स्वतंत्रपणे चुशुलमध्ये एक अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडलाही (एएलजी) पुनर्जीवित करत आहे. चुशुल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे. भविष्याच्या योजनेच्या अंतर्गत या एएलजीला मानवरहित विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या संचालनासाठी विकसित केले जात आहे. चुशुलची वर्तमान धावपट्टी अधिक लांब असल्याने तेथे सी-295 आणि सी-130जे विमानही उतरू शकते.

Advertisement
Tags :

.