‘एनव्हीएस-03’ उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित
‘जीएसएलव्ही-एफ18’ रॉकेटची दिमाखदार कामगिरी
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारताची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली मजबूत करण्याच्या महत्त्वपूर्ण मोहिमेअंतर्गत, देशाचा पुढच्या पिढीचा नेव्हिगेशन उपग्रह ‘एनव्हीएस-03’ जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही-एफ18) रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री 11:51 वाजता झाले. भारताची अंतराळ संस्था इस्रोने ‘एक्स’वर यासंबंधीची घोषणा केली आहे. भारताची स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली ‘एनएव्हीआयसी’ सध्या उपग्रहांच्या कमतरतेचा सामना करत असताना हे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जात आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देशाची नेव्हिगेशन प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:51 वाजता जीएसएलव्ही-एफ18 रॉकेटद्वारे बहुप्रतिक्षित नेव्हिगेशन उपग्रह ‘एनव्हीएस-03’ अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. जीएसएलव्ही-एफ18 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलचे (जीएसएलव्ही) 20 वे उ•ाण ठरले. जीएसएलव्ही-एफ18 रॉकेट एनव्हीएस-03 उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित केले आहे. हे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून करण्यात आले.
नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचा तिसरा उपग्रह
एनव्हीएस-03 हा नेक्स्ट जनरेशन नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचा तिसरा उपग्रह आहे. याची रचना ‘आयआरएनएसएस’ मालिकेसाठी अखंड नेव्हिगेशन सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे. या उपग्रहाच्या अवकाशातील तैनातीमुळे देशाचे जीपीएसवरील अवलंबित्व कमी होईल. ही नेव्हिगेशन प्रणाली सामान्य जनतेसाठी मोबाईल नेव्हिगेशन, नागरी विमान वाहतूक आणि सागरी नेव्हिगेशनसाठी वापरली जाईल. तसेच लष्कर आणि हवाई दलाच्या सामरिक कार्यांसाठी अचूक आणि सुरक्षित डेटा प्रदान करणार आहे.
