अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविणार पोषण अभियान
महिला-बालकल्याण खात्यातर्फे बालक-गर्भवतींसाठी विशेष उपक्रम
बेळगाव : ‘साक्षर भारत, सशक्त भारत’ याअंतर्गत महिला व बालकल्याण खात्यामार्फत सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये या अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबत सीडीपीओ आणि अंगणवाडी केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत. बालक आणि गर्भवती महिलांना पोषण आहार मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत माता बैठक, प्रभातफेरी, सकस आहार, पोषण आहाराचे महत्त्व, आहाराबाबत जागृती, पोषण आहार प्रात्यक्षिक आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात 5331 लहान-मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये नवीन केंद्रांची भर पडली आहे. या सर्व केंद्रांमध्ये हे अभियान राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विशेषत: ग्रामीण भागात बालके आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये आहाराच्या जागृतीबरोबर प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. त्यांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच 0 ते 13 वर्षांखालील सर्व बालकांना आहाराबाबत माहिती दिली जाणार आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये या कार्यक्रमांतर्गत सहभोजन, डोहाळे कार्यक्रम, आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा आणि इतर उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यामध्ये बालक आणि गर्भवती महिलांचा समावेश असणार आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पोषण आहार अभियान हाती घेण्यात आले आहे.
पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून अभियान
सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. बालक आणि गर्भवती महिलांच्या पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
- आण्णाप्पा हेगडे (कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण खाते)