टायगरसोबत झळकणार नुसरत
दिग्दर्शक रेमो डिसूझा एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यात मुख्य नायक म्हणून टायगर श्रॉफची निवड करण्यात आली आहे. टायगरची नायिका म्हणून नुसरत भरूचा आणि पश्मीना रोशन दिसून येणार आहेत. या चित्रपटाद्वारे टायगर अन् नुसरत ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे.
या चित्रपटातून एल्विश यादव बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऋतिक रोशनची नातेवाईक पश्मीना देखील या चित्रपटात काम करत आहे. अभिषेक बॅनर्जी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आगाज एंटरटेनमेंट, व्हीजे फ्रेम फिल्म्स आणि इंसोम्निया फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विक्की जैन या चित्रपटाशी जोडला गेलेला आहे. व्हीजे फ्रेम्स ही विक्की जैन याचीच कंपनी आहे.
टायगर श्रॉफ यापूर्वी ‘बागी 4“ चित्रपटात दिसून आला होता. ए. हर्षा यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत होती. तर नुसरत भरूचा यापूर्वी कॉमेडी थ्रिलरपट ‘उफ्फ ये सियापा“मध्ये सोहम शाहसोबत दिसून आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.