For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहावीच्या मराठी पाठ्यापुस्तकात असंख्य चुका

06:29 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहावीच्या मराठी पाठ्यापुस्तकात असंख्य चुका
Advertisement

मराठीचा अवमान करण्याच्यादृष्टीनेच जाणीवपूर्वक चुका : 

Advertisement

प्रतिनिधी/ खानापूर

इयत्ता सहावीच्या मराठी भाग पहिला या पाठ्यापुस्तकात अनेक शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत. हे पुस्तक शिक्षकांनाही शिकविण्यास जमणार नाही. हे पुस्तक तातडीने नव्याने शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्ती करून पुन्हा छापून शाळांना पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचताही येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणीवपूर्वक मराठी पुस्तकात चुका केल्याची चर्चा होत आहे. पाठ्यापुस्तक मंडळाला शुद्ध लेखनाच्या परीक्षणासाठी पुस्तक न देताच छापण्यात आल्याचे पुस्तक मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

इयत्ता सहावीच्या माय मराठी भाग पहिला या पुस्तकात सर्वच पाठांमध्ये शुद्ध लेखनाच्या असंख्य चुका असून काना, मात्रा, वेलांटी आवश्यक ठिकाणी नसल्याने वाक्यरचना समजून येत नाही. त्यामुळे वाचन करण्यासही हे पुस्तक जमत नाही. तसेच शिक्षकांनाही पुस्तक वाचताना अर्थबोध होत नसल्याने या पुस्तकाच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकविणे शिक्षकाना कठीण जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक वाचताना अर्थबोध होणार नसल्याने हे पुस्तक तातडीने परत घेऊन शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून परीक्षण मंडळाच्या माध्यमाधून हे पुस्तक नव्याने छापणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्वच विषयाच्या पुस्तकात भाग एक आणि भाग दोन अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांसाठी पहिला भाग शिकविण्यात येणार आहे. यात मराठी सहावीच्या पाठ्यापुस्तकात माय मराठी भाग एक हे पुस्तकच पूर्णपणे चुकीचे छापण्यात आल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्रासाचे ठरले आहे. त्यामुळे हे पुस्तकच तातडीने परत घेऊन पुन्हा नव्याने शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून छापणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या द्वेषापायीच कर्नाटक सरकारने मराठी पुस्तकात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चुकीचे पुस्तक छापण्यात आले आहे. छापण्यापूर्वी शुद्धलेखन तपासण्यासाठी पुस्तक मंडळाकडे देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुस्तक पुन्हा नव्याने छापणे आवश्यक

याबाबत परीक्षण मंडळाचे अध्यक्ष पी. के. मुचंडीकर यांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी आम्ही पुस्तक तयार करून दिले होते. त्यावेळी एकच पुस्तक अभ्यासक्रमात होते. यावर्षीपासून भाग एक आणि भाग दोन असे करण्यात आले आहे. मात्र सहावीचे मराठी भाग एक हे पाठ्यापुस्तक मंडळाला शुद्धलेखन तपासण्यासाठी देण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही हे पुस्तक छापण्यापूर्वी वाचलेले नाही. तसेच गेल्या दहा वर्षांपूर्वी पुस्तक निर्मिती करताना हे मंडळ अस्तित्वात होते. या परीक्षण मंडळातील काही सदस्य निवृत्त झाले आहेत. तर एकाचे निधन  झाले आहे. असे असताना नव्याने पुस्तक परीक्षण मंडळ निर्माण करणे गरजेचे होते. मात्र दहा वर्षांपूर्वीचेच मंडळ पुस्तकात छापण्यात येते. हे पुस्तक छापण्याअगोदर आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. तसेच छापण्याअगोदर शुद्धलेखन तपासणीसाठी प्रत आम्हाला देण्यात आलेली नाही. या पुस्तकात मोठ्या प्रमाणात चुका आहेत. यासाठी हे पुस्तक पुन्हा नव्याने छापणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.