राज्यातील नगरपालिकांच्या नगरसेवकांची संख्या निश्चित
पणजी : राज्य निवडणूक आयोगाने गोव्यातील विविध नगरपालिकांसाठी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांची मर्यादा निश्चित केली असून तशी अधिसूचना जारी केली आहे. पुढील काही महिन्यात राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या कदाचित पावसापूर्वी होतील, असा अंदाज आहे. मडगाव पालिकेसाठी 24 नगरसेवकांची संख्या मर्यादा ठरवली असून त्या खालोखाल मुरगाव-21 तर म्हापसा- 20 अशी संख्या निश्चित केली आहे. कुडचडे-काकोडा- 15, डिचोली व कुंकळ्ळी पालिका- 14, केपे- 13, काणकोण- 12, वाळपई, पेडणे, सांगे पालिका- 10 नगरसेवकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मडगाव व मुरगांव या पालिकांचा ‘अ’ गटात समावेश असून म्हापसा, कुडचडे-काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे व काणकोण यांना ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे. पेडणे, वाळपई, सांगे या पालिकांचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांची संख्या मर्यादा महत्त्वाची असून त्या संख्येच्या प्रभगांसाठी नगरसेवकांसाठी निवडणूक घेणार आहेत. सध्या आयोगाने नगरसेवकांची मर्यादा निश्चित करणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले.